नवीमुंबई ते मुंबई बोट सेवा सुरु होणार, इतक्या कमी वेळात प्रवास सुसाट होणार
नवीमुंबईतील नेरुळ जेट्टीहून बोटीने आता भाऊचा धक्का असा जलप्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. रेल्वे आणि रस्ते मार्गानंतर आता जलमार्गानेही नवीमुंबई ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे.

नवीमुंबई ते दक्षिण मुंबईतील भाऊचा धक्का असा जलप्रवास सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीमुंबईतील सिडकोच्या नेरुळ जेट्टी ते भाऊचा धक्का असा जलप्रवास सुरु होणार आहे. त्यामुळे नवीमुंबई ते मुंबई बेटावर केवळ अर्ध्या तासात पोहचता येणार आहे. या जलप्रवासासाठी ९३५ रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते मार्गाच्या पेक्षा कमी वेळात मुंबईत पोहचता येणार आहे.
सिडकोच्या नेरुळ जेट्टी ते भाऊचा धक्का ही रखडलेली जलप्रवास योजना आता १५ डिसेंबर पासून सुरु होत आहे. त्यामुळे नवीमुंबईतील प्रवाशांना आता जलमार्गे देखील मुंबई गाठता येणार आहे. सिडकोने पाम बीच मार्गाजवळ नेरुळमध्ये जेट्टी बांधली होती. या जेट्टीतून आधी रो-रो सेवा सुरु करण्याचा विचार होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा बारगळी आहे. आता जेट्टी तयार असूनही अनेक वर्षे येथून जलप्रवास सुरु झाला नव्हता. आता येत्या १५ डिसेंबर पासून नेरुळ ते भाऊचा धक्का असा जलप्रवास करता येणार आहे.
सध्या नेरुळ ते गेटवे जवळील घारापूरी बेटा दरम्यान जलवाहतूक सुरु आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन बोटीच्या फेऱ्या होत आहेत. याकरीता प्रति व्यक्ती ५६० रुपये तिकीट दर आहे. नेरुळ ते भाऊचा धक्का असा जलप्रवास सुरु करण्याची परवानगी महाराष्ट्र मेरीबोर्डाकडे प्रलंबित आहे. या मागणीवर आठवडाभरात निर्णय होऊन आता येत्या १५ डिसेंबरपासून ही सेवा प्रत्यक्षात अस्तित्वात येणार आहे.
तिकीट दर किती ?
नेरुळ ते भाऊचा धक्का अशा जलप्रवासाला ९३५ रुपये तिकीट दर आहे. नेरुळ ते भाऊचा धक्का जलसेवेसाठी २० आसनाची बोट आहे. दिवसभरात सकाळ आण संध्याकाळ अशा चार फेऱ्या होणार आहेत. अवघ्या अर्ध्या तासात नेरुळ वरुन भाऊचा धक्का येथे पोहचता येणार आहे. महाराष्ट्र मेरीबोर्डाने या संदर्भात हिरवा कंदील दाखवताच ही सेवा सुरु होणार आहे.९३५ रुपये हा तिकीट दर थोडा जास्त असून हा तिकीट दर सामान्यांना परवडणारा नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. शिवाय भाऊचा धक्का ते मुंबईतील फोर्ट भागात जाण्यासाठी बेस्टच्या बसेसची संख्या देखील अपुरी असल्याने या सेवेला कितपत प्रतिसाद मिळणार हा देखील प्रश्नच असल्याचे म्हटले जात आहे.
