यंदा ‘लाडक्या बहिणी’पासून ‘दादा’ दूरच, अजित पवार-सुप्रिया सुळेंचे रक्षाबंधन नाही, ‘या’ खासदाराला बांधली राखी
सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा मोठा गाजावाजा सुरु आहे. या योजनेचा प्रचार करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रक्षाबंधन मात्र यंदा झाले नाही.

Ajit Pawar-Supriya Sule Raksha Bandhan : भाऊ-बहिणीच्या नात्याचं, त्यांच्यातील प्रेमाचं प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधते. तसेच त्याला दीर्घ आयुष्य आणि सुख लाभू दे यासाठी प्रार्थना करते. तर त्याचवेळी भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. भारतात सर्वत्रच हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वसामान्यांसह मंत्री, राजकीय व्यक्ती मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करतात. सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा मोठा गाजावाजा सुरु आहे. या योजनेचा प्रचार करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रक्षाबंधन मात्र यंदा झाले नाही.
यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या रक्षाबंधनाची खास चर्चा रंगली होती. मात्र खासदार सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर असल्याने त्यांनी अजित पवार यांना राखी बांधली नाही. तर दुसरीकडे अजित पवारही त्यांच्या पूर्वनियोजित मुंबई दौऱ्यावर होते. त्यामुळे त्या दोघांनाही रक्षाबंधन साजरा केला नाही. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे ‘लाडक्या बहिणी’ पासून ‘दादा’ दूरच राहिले.
लोकसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. यामुळे पवार कुटुंबात दुफळी निर्माण झाली. मला कुटुंबात एकाकी पाडले जात आहे, अशी जाहीर खंतही अजित पवारांनी व्यक्त केली. यानंतर राजकारण वेगळे आणि कौटुंबिक नाते वेगळे असते. राजकीय भूमिकांचा परिणाम पवार कुटुंबावर होणार नाही, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे त्यांनी रक्षाबंधन साजरे केले नाही.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवारांना रक्षाबंधनाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर राखी बांधून घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. तर सुप्रिया सुळे यांनी मी नाशिकमध्ये आहे. कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तर स्वागत करेन, अशी प्रतिक्रिया दिली होती. सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नाशिकमधील चांदवडमध्ये झालेल्या मेळाव्यादरम्यान भास्कर भगरे यांचा औक्षण करत राखी बांधली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
