पळून-पळून जाणार कुठे ? राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर अजित पवारांचं महत्वाचं वक्तव्य
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन दुर्घटना घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सुनील तटकरे देखील उपस्थित होते. राजकोट किल्ल्यावर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. उद्घाटनानंतर आठ महिन्यात शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने राजकारण तापलं असून विरोधकांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यातच सत्तेत सहभागी असणाऱ्या अजित पवार गटाने याप्रकरणी आंदोलनाची भूमिका घेतली.काल राष्ट्रवादीतर्फे आंदोलनही करण्यात आले. याच दरम्यान आज ( शुक्रवार) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन दुर्घटना घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सुनील तटकरे देखील उपस्थित होते. राजकोट किल्ल्यावर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
अजित पवारांनी टोचले सरकारचे कान
‘ हा पुतळा नेव्हीने की PWDनं केला, असला वाद घालण्यात काहीच अर्थ नाही,’ असं म्हणत अजित पवारांनी सरकारमधील नेत्यांचेच कान टोचले. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अजित पवार यांनी दिला. शिवरायांचा पुन्हा भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.
याप्रकरणातील स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेला आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे हा अद्याप फरार असून त्याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याप्रकरणी देखील अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ‘ काही व्यक्ती ज्यांनी पुतळ्याचं काम केलंय, ते सापडत नाहीत. पण तो पळून पळून जाणार कुठे, तो देश सोडून तर जाऊ शकत नाही. त्याला लवकरच शोधलं जाईल. पुतळा उभारतानाा नेमकी काय चूक झाली, हे त्याच्याकडून जाणून घेतलं जाईल’, असे अजित पवार यांनी म्हटले.
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर येऊन भेट देखील देऊन गेले आहेत. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या किल्ल्यावर येऊन दुर्घटना स्थळाची पाहणी केली. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यासोबत यावेळी होती.
ज्याठिकाणी पुतळा कोसळण्याची ही दुर्दैवी घटना घडली, त्यांनी तेथील पाहणी केली. राजकोट किल्ल्याच्या बुरूजापासून ते जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा, स्ट्रउभा होता त्या ठिकाणच्या पाहणीसाठी ते दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत खा. सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. संपूर्ण घटनेचा त्यांनी आढावा घेतला.
विरोधकांचे ताशेरे
छ. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यीची ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर विरोधकांनी सरकारवर ताशेर ओढले होते. त्यानंतर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी शिवरायांचा पुतळा कोसळला ही गंभीर बाब आहे. राज्यातील 13 कोटी जनतेची मी जाहीर माफी मागतो असं म्हटलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्याने अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान दिलं.
खरंच शिवप्रेमी असाल तर सत्तेवर लाथ मारा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार वैभव नाईक यांनी अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान दिलं. अजित पवारांनी आंदोलन करावं. शिवप्रेमी म्हणून त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. परंतु त्यांनी सत्तेतून बाहेर पडायचं धाडस दाखवायला हवं. अजित पवारांनी सत्तेवर लाथ मारली पाहिजे. अशी नौटंकी करून चालणार नाही. खरंच शिवप्रेमी असाल तर सत्तेवर लाथ मारा, असं वैभव नाईक म्हणाले होते.
