देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करणारे अनिल देशमुख यांच्या चिरंजीवांनी मानले सुधीर मुनगंटीवार यांचे जाहीर आभार
देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे सलील देशमुख यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा आपला फोटोदेखील शेअर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात वाकयुद्ध एकीकडे रंगलेलं बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी भाजप नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. सलील देशमुख यांनी ट्विट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात निवृत्त एपीआय सचिन वाझे याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनीसुद्धा तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या सगळ्या घडामोडींनंतर आता सलील देशमुख आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात एका विषयावरुन मनोमिलन झाल्याचं बघायला मिळत आहे.
सलील देशमुख नेमकं काय म्हणाले?
“धन्यवाद, सुधीरभाऊ मुनगंटीवार! आपण काटोल तालुक्यातील केदारपुर येथे पर्यंटन विकासासाठी २ कोटी ३0 लाख रुपये मंजुर केले. कटकारस्थान न करता, संकुचित विचार न करता मोठ्या मनाने हा निधी आपण उपलब्ध करुन दिलात. आज महाराष्ट्रातील राजकारणात जो गलिच्छपणा आला आहे त्याला आपण छेद दिलात. गेल्या अनेक दिवसांपासून आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल काटोलच्या जनतेच्या वतीने सुधीरभाऊ आपले मनःपूर्वक आभार”, असं ट्विट सलील देशमुख यांनी केलं आहे.
धन्यवाद, सुधीरभाऊ मुनगंटीवार!
आपण काटोल तालुक्यातील केदारपुर येथे पर्यंटन विकासासाठी २ कोटी ३0 लाख रुपये मंजुर केले.
कटकारस्थान न करता, संकुचीत विचार न करता मोठ्या मनाने हा निधी आपण उपलब्ध करुन दिलात. आज महाराष्ट्रातील राजकारणात जो गलिच्छपणा आला आहे त्याला आपण छेद दिलात.… pic.twitter.com/kd36eFcnEQ
— Salil Deshmukh (@SalilADeshmukh) August 7, 2024
अनिल देशमुखांवरील आरोपांवर सलील देशमुख काय म्हणाले होते?
दरम्यान, सलील देशमुख यांनी आपल्या वडिलांवर करण्यात आलेल्या आरोपांविरोधात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. “परमवीर सिंह यांची विश्वासार्हता नाही. कुणाच्या सांगण्यावरून परमवीर सिंह आता बोलत आहे हे समजून घेतलं पाहिजे. वाजे कोणाच्या सांगण्यावरून बोलत आहे हेही समजून घेतलं पाहिजे. परमवीर सिंह काय सांगतो, तो म्हणतो हातपाय जोडले. तो स्वतः दाढी मिशा कापून परमवीर सिंह सहा महिने कुठल्या बिळात लपून बसला होता? परमवीर सिंह तुझी डील देवेंद्र फडणवीसांसोबत झाली आहे. मग नार्को चाचणी करायची असेल, तर माझी झाली पाहिजे, परमवीर सिंह याची झाली पाहिजे आणि त्या संदर्भात त्यांचीही ( फडणवीस) नार्को चाचणी तयारी झाली पाहिजे”, अशी मागणी सलील देशमुख यांनी केली होती.
“परमवीर सिंह यांच्यासोबत माझी अनिल देशमुख गृहमंत्री होण्याच्या आणि परमवीर सिंह मुंबईचे आयुक्त होण्याच्या आधी काही वेळा भेट झाली होती. मात्र त्या भेटीचा संदर्भ त्यांनी अशा पद्धतीने देणे चूक आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप झाल्यानंतर कधीच परमवीर सिंह यांच्यासोबत माझी भेट झाली नाही”, अशी प्रतिक्रिया सलील देशमुख यांनी दिली होती.
“एंटेलिया स्फोटक प्रकरणाचा मास्टर माईंड परमवीर सिंह आहे. परमवीर सिंह आणि सचिन वाझे यांना बोलायचे होते तर त्यांनी आधी हे सर्व का सांगितले नाही, कोर्टापुढे जाऊन का सांगितले नाही? आता उपमुख्यमंत्री यांच्यावर वेळ आली तेव्हा पोपट सारखे बोलायला लागले आहेत. परमवीर सिंह याचे स्वतःचे रवी पुजारी सारख्या गुन्हेगारांसोबत संबंध राहिले आहेत. परमवीर सिंह यांच्या पत्नी आणि मुलांचे कुठल्या कुठल्या कंपनीत शेअर्स आहेत याची माहिती घेतली पाहिजे”, अशी टीका अनिल देशमुख यांच्यावर केली होती.
