महापालिका निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी भाजपला देणार मोठा हादरा? महायुतीच्या गोटातून सर्वात मोठी बातमी
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्याचपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. भाजपकडून विभाग स्तरावरील बैठकांचं आयोजन करण्यात येत असून, या बैठकांच्या माध्यमातून तयारीचा आढावा सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं देखील आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर? याबाबतच चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
आता एका मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, ते जळगावमध्ये बोलत होते. जळगाव जिल्ह्यात महायुती झाली तर ठीक, नाहीतर आगामी जिल्हा परिषद , नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल पाटील?
राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. महायुती झाली तर ठीक, नाहीतर आगामी जिल्हा परिषद , नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार असं त्यांनी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभा, लोकसभेत आमचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करावा का? हे न शोभणारे आहे. महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना सांभाळणं ही प्रत्येक पक्षाच्या नेत्याची जबाबदारी आहे, त्यामुळे युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही सुद्धा जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या सर्व जागा लढवू आणि आमच्या क्षमतेनुसार आमची ताकद दाखवू, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचे संकते दिले होते, त्यानंतर आता पाटील यांनी देखील मोठं विधान केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
