भोसले कुटुंबातील काका-पुतणे शरद पवारांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत? वाईत काय घडतंय?
सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघातील मदन भोसले आणि यशराज भोसले या काका-पुतण्याला आपल्या गळाला लावण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.

माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे नातू आणि भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी खासदार शरद पवारांची नुकतीच भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं. तर दुसरीकडे भाजप नेते मदन भोसले यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. वाई मतदारसंघातील मदन भोसले आणि यशराज भोसले या काका-पुतण्याला आपल्या गळाला लावण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.
वाई मतदारसंघातून महायुतीतून अजित पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित समजली जातेय. त्यांचे विरोधक मदन भोसले जे भाजपमध्ये आहेत ते अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत. त्यामुळेच शरद पवारांनी या भोसले घराण्यातील काका पुतण्याला आपल्या पक्षात घेण्यासाठी आणि वाईतून मकरंद पाटील यांच्या विरोधात काका किंवा पुतण्याला उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे.
जयंत पाटील यांच्यासोबतच्या आज झालेल्या बैठकीबाबत भाजप नेते मदन भोसले यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास पूर्णपणे नकार दिला. यामुळे यापुढील काळात वाई विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार गटाला लोकसभेसारखंच यश मिळणार?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट चांगलाच कामाला लागला आहे. शरद पवार गटात जोरदार हालचाली घडत आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला चांगलं यश मिळालं आहे. शरद पवार गटाने लोकसभेत 10 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 8 जागांवर शरद पवार गटाला यश मिळालं होतं. त्यानंतर आता विधानसभेतही सर्वाधिक जागांवर यश मिळवण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे. त्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
