सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? शरद पवार गटाच्या माजी आमदाराचं मोठं भाकीत
"संसदपटू सुप्रिया सुळे या मला आदिशक्ती, आदिमाया वाटतात. मला त्यांचे वक्तृत्व पक्षप्रमुख शरद पवार यांच्यापेक्षा सरस वाटतं. त्या उद्या सत्तेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील", असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी आमदाराने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. “संसदपटू सुप्रिया सुळे उद्या सत्तेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील आणि आमदार रोहित दादा पवार कॅबिनेमध्ये जाणार”, असं मोठं भाकीत जयवंतराव जगताप यांनी वर्तवलं. “संसदपटू सुप्रिया सुळे या मला आदिशक्ती, आदिमाया वाटतात. मला त्यांचे वक्तृत्व पक्षप्रमुख शरद पवार यांच्यापेक्षा सरस वाटतं. त्या उद्या सत्तेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील. भविष्यात शरद पवारांचे स्वप्न पूर्ण होणार. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. बळीराजाचे राज्य येईल. जे बेरोजगार आहेत ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम मिळेल”, असा दावा जयवंतराव जगताप यांनी केला.
“सगळ्यांना न्याय मिळेल म्हणून शरद पवारांची तुतारी आबांच्या (माजी आमदार नारायण पाटील ) यांच्या माध्यमातून हातात घेतली. कॅबिनेटमध्ये रोहित दादा पवार जाणार. भैय्यासाहेब (खासदार धैर्यशील मोहिते पाटील) आणि रणजितदादा मोहिते पाटील हे वरच्या पदावर जाणार आणि मी त्यांच्या प्रचाराला येणार”, असं माजी आमदार जयवंतराव जगताप नारायण पाटील यांच्या प्रचारसभेत म्हणाले.
जयवंतराव जगताप यांचं रोहित पवार यांच्याबद्दलही मोठं वक्तव्य
“विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रिटेवाडी उपसासिंचन योजनेचा प्रश्न सोडवू, असे शरद पवार यांनी अभिवचन दिले आहे. त्यामुळे भविष्यकाळात करमाळा तालुक्यातील उत्तर भाग हा ओलिताखाली येणार आहे. भविष्यकाळात ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी सुद्धा आपण रस्ते मंजूर करून घेऊ. कारण त्याठिकाणी रोहितदादा पवार हे कॅबिनेट मंत्री असणार आहेत. दादासाहेब तुमच्या खांद्यावर करमाळा तालुक्याचा भार असणार आहे. आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या सोडविणार असे सांगावेसे वाटते”, असं जयवंतराव जगताप म्हणाले.
दरम्यान, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी इंदापूर येथील विद्याप्रतिष्ठान येथे शरद पवार आणि इंदापूरचे शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांची दीपावलीनिमित्त भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. जयवंतराव जगताप यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाचे उमेदवार नारायण पाटील यांना पाठिंबा दिला आहे. या भेटीवेळी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते.