Nishikant Dubey – Raj Thackrey : मी राज ठाकरेंना हिंदी शिकवलं..? व्हिडीओ शेअर करत निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
राज ठाकरेंनी निशिकांत दुबेंना दिलेल्या धमकीनंतर हा वाद अधिक तीव्र झाला आहे. दुबेंनी राज ठाकरेंना हिंदी शिकविल्याचा दावा केला असून, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी खोचक टीका केली आहे. मराठी आणि हिंदी भाषेचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. दोन नेत्यांमधील शाब्दिक युद्ध सुरूच आहे.

मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून राज्यात चांगलाच वाद पेटला असून त्यावरून भूमिका घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजपच्या नेत्याने सुनावलं होतं. पटक पटक के मारेंगे असं आक्षेपार्ह विधान करत बाजप नेते निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. त्यांच्या याच विधानाच काल राज ठाकरेंनी मिरा-भाईंदरमध्ये समाचार घेतला होता. तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच सांगतो. दुबे, तुम मुंबई में आ जाव. मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असा थेट इशारा राज ठाकरेंनी कालच्या भाषणात दिला. मात्र त्यानंतरही निशिकांत दुबे शांत बसलेले नसून त्यांनी पुन्हा चिमटा काढला आहे.
सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या भाषणाचा आणि आपल्याला दिलेल्या इशाऱ्याचा एक व्हिडीओ पोस्ट करत निशिकांत दुबेने खोचक टीका केली आहे. “मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ?”असं लिहीत दुबेंनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलंय. दुबे समंदर में डुबे डुबे के मारेंगे अशी टीका राज यांनी केली होती. त्याच भाषणाचा व्हिडीओ दुबे यांनी त्यांच्या एक्स ( पूर्वीचं ट्विटर) अकाऊंटवर शेअर करत ही मल्लिनाथी केली असून एका प्रकारे राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं आहे. त्यांच्या शब्दाला आपण फारशी किंमत देत नसल्याचंच त्यांनी या ट्विटमधून एका प्रकारे दर्शवलं आहे. मात्र यामुळे मनसे आणि भाजपातील वाद आणि मराठी-हिंदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येऊन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ? https://t.co/5YpM1SrzDt
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 18, 2025
काही दिवसांपूर्वी मुंबईत एका दुकानदाराने मराठी न बोलल्याबद्दल मारहाण करण्यात आली, त्यावर मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता. याच वादावर भाजप खासदार निशिकांत दुबे प्रतिक्रिया देत उद्धव आणि राज यांच्यावर टीका केली होती. आणि त्यांना पटक-पटक के मारेंगे (त्यांना धोपटून काढू)” असे म्हटले होते.मात्र दुबे यांच्या या विधानामुळे बराच वाद निर्माण झाला होता. ते म्हणाले होते की, “मुंबईत हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा, तमिळ आणि तेलगू भाषिकांना मारून दाखवा.” “जर तुम्ही इतके मोठे बॉस असाल तर बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये या, आम्ही तुम्हाला मारहाण करू (तुमको पटक-पटक के मारेंगे।)” असं विधान दुबेंनी केलं होतं.
राज ठाकरेंचं दुबेंना प्रत्युत्तर
मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर मनसेनं देखील मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढला, त्यानंतर काल राज ठाकरेंची मिरा-भाईंदरमध्ये सभा झाली, तेथे त्यांनी दुबेंना प्रत्युत्तर दिलं. राज यांनी दुबे यांना मुंबईत येण्याचे आव्हान दिलं. ते म्हणाले, ” “भाजपच्या एका खासदाराने म्हटले की आम्ही इथे मराठी लोकांना मारहाण करू… तुम्ही मुंबईत या. आम्ही त्यांना मुंबईच्या समुद्रात बुडवून मारू.( मुंबई के समुंदर में डूबो-डुबो के मारेंगे।)” मात्र हे त्यांनी हिंदी भाषेत म्हटलं, त्यांच्या याच विधानावर दुबेंनी खोचक टीका करत चिमटा काढला आणि ते म्हणाले, मी राज ठाकरेंना हिंदी शिकवलं…
त्यांच्या या विधानाचे आता काय पडसाद उमटतात मनसे अध्यक्ष आणि इतर नेते त्यावर काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
