उद्धव ठाकरे जिहाद हृदयसम्राट, ते मुंबईचं नाव बदलून…; भाजप आमदाराची टोकाची टीका
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली असून ठाकरे कुटुंब मूळचे महाराष्ट्राचे आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईचा विकास फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा दावा करत त्यांनी ठाकरेंना 'लुटारू' संबोधले आहे.

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना आता मोठा वेग आला आहे. महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध शिगेला पोहोचले आहे. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे जरी मुंबईत जन्माला आले असले, तरी मूळ ठाकरे कुटुंब महाराष्ट्राचे आहे का, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. आम्ही मुळापर्यंत पोहोचायचं का, मूळ बाहेर काढायचं का? मग आम्हालाही तोंड उघडायला लागेल, असा इशाराही नितेश राणेंनी यावेळी दिला.
त्यांनी मुंबईसाठी नक्की काय दिवे लावले?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्यांनी मुंबईसाठी नक्की काय दिवे लावले. त्यांनी फक्त बांगलादेशी आणि रोहिंगे वाढवले, मुंबईचे हिरवीकरण केले. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईच्या विकासासाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे काम केले, ते यांना इतक्या वर्षांत जमले का? असा टोला नितेश राणेंनी लगावला. उद्धव ठाकरेंना फक्त मातोश्री १ चे मातोश्री २ करणेच जमले, अशी टीकाही नितेश राणेंनी केली आहे.
हे फक्त लुटारु
मुंबई हे त्यांच्यासाठी खाण्यासाठी, पोट भरण्यासाठी आणि बाहेरगावचे दौरे करण्यासाठीच महापालिकेची सत्ता होती. मुंबईला खऱ्या अर्थाने ज्यांनी कोणी विकसित केलं असेल, तर ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हे फक्त लुटारु आहेत. जिहाद हृदयसम्राट उद्धव ठाकरे हे फक्त लुटारु आहेत, असे नितेश राणे म्हणाले.
सुरक्षित ठेवणाऱ्या लोकांच्या हातातच मुंबई दिली पाहिजे
जर १५ तारखेला मुंबईकर सतर्क राहिले नाहीत, तर हे लोक मुंबईचे नाव बदलून मोहम्मद लँड करून टाकतील. त्यांची तशी तयारी असून त्यासाठी ते फतवेही काढतील. त्यामुळे मतदारांनी सुरक्षित ठेवणाऱ्या लोकांच्या हातातच मुंबई दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
बाळासाहेबांच्या नावाने महापौर बंगला हडपला
यावेळी नितेश राणेंनी महापौर बंगल्यावरूनही निशाणा साधला. आम्ही पाकिस्तानचे आहोत का, आम्ही मूळ मुंबईकर आहोत. महाराष्ट्राच्या बाहेरचे नाही. आम्ही बाहेरुन आलेल नाही. नाहीतर मग एक पत्रकार परिषद घेऊन कोण कुठून आलं, ठाकरे बंधूंना दाखवावं लागेल. त्यामुळे कोणाच्या मुळापर्यंत जाण्याआधी आमच्याकडेही बघा. बाळासाहेबांच्या नावाने महापौर बंगला हडपला. तिथे तुमचा मुलगा नाईटलाईफची थेर करतो. हे तुम्ही केलं, असा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला.
