मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वचन दिलंय, चौकशी होणारच; किरीट सोमय्या यांचं कोल्हापुरात येऊन मोठं विधान

भूषण पाटील

| Edited By: |

Updated on: Jan 16, 2023 | 12:39 PM

हसन मुश्रीफ यांनी जो भ्रष्टाचार केला त्याच्या पै आणि पैचा हिशोब किरीट सोमय्या जनतेला देणार आहे. माउंट कपिटल, आणि रजत कंझ्युमर या बंद कंपन्यातून पैसे कसे आले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वचन दिलंय, चौकशी होणारच; किरीट सोमय्या यांचं कोल्हापुरात येऊन मोठं विधान
kirit somaiya
Image Credit source: tv9 marathi

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर पहिल्यांदाच भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात आले आहेत. कोल्हापुरात येऊन सोमय्या यांनी थेट हसन मुश्रीफ यांच्यासह ठाकरे गटावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला वचन दिलं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ प्रकरणाची चौकशी होणारच आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमय्या यांनी थेट कोल्हापुरात येऊन हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या यांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबाच्या खात्यात का आले? याच उत्तर द्या. रजत कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अस्तित्वात नसताना हे पैसे आले. बंद पडलेल्या कंपन्यांमधून खात्यात पैसे कसे येतात हे कोल्हापूरकरांना कळू द्या. हे पैसे कसे आले हे कळलं तर कोल्हापूरकर आयुष्यभर नव्हे सात जन्म नमस्कार करतील, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

ग्रामविकास मंत्री असताना जावयासाठी ग्रामपंचायतींना झिझिया कर लावला गेला. मुश्रीफ कोणाला मूर्ख बनवत आहेत? कंत्राट रद्द केलं म्हणतात. पण आधी दिलं तर होत ना? मी प्रकरण बाहेर काढल्यानंतर कंत्राट रद्द केलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार आहे. स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला तसे वचन दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

हसन मुश्रीफ यांनी जो भ्रष्टाचार केला त्याच्या पै आणि पैचा हिशोब किरीट सोमय्या जनतेला देणार आहे. माउंट कपिटल, आणि रजत कंझ्युमर या बंद कंपन्यातून पैसे कसे आले. भावना गवळी, प्रताप सरनाईक यांनी तुमच्या आशीर्वादाने घोटाळा केला असेल. तुम्ही आता त्यांनी केलेल्या घोटाळ्यांची माहिती द्या, मी वाट पाहतोय, असं आव्हानच त्यांनी दिलं.

विशिष्ट समुदायाच्या व्यक्तींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. त्यावरही सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर मुश्रीफ यांनी केलेलं विधान मला मान्य आहे असं सांगावं. हिरवा झेंडा घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी हे विधान मान्य आहे असं सांगावं. घोटाळे केले त्यावेळी धर्म आठवला नाही का? असा सवाल सोमय्या यांनी केला.

घोटाळे आणि त्याची कागदपत्रे पाहून हसन मुश्रीफ चिंतित झाले आहेत. त्यामुळेच मुश्रीफ वेगवेगळे वक्तव्य करत आहेत, असं ते म्हणाले. सरकारवर आरोप करण्यापेक्षा 32 महिन्यात काय दिवे लावले हे संजय राऊत यांनी पाहावं, असं सोमय्या म्हणाले.

यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या ईडी चौकशीवरही भाष्य केलं. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. तत्त्कालीन सरकारच्या नेत्यांसाठी कोरोना हे कमाईचे साधन होतं.

संजय राऊत, सुजित पाटकर यांनी घोटाळा केला. ज्यांना अनुभव नाही अशांना शंभर कोटीचे कॉन्ट्रॅक्ट कसे दिले असा सवाल आम्ही उपस्थित केलाय, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI