उद्धव सेना पुन्हा फुटणार? उदय सामंत यांच्या राजकीय भूकंपाच्या दाव्यानंतर शरद पवारांची थेट प्रतिक्रिया
Sharad Pawar on Udhav Thackeray Shivsena : उदय सामंत यांनी काल उद्धव ठाकरे सेनेत मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला. आजपासून त्याचा ट्रेलर समोर येईल असे ते म्हणाले, त्यावर आता शरद पवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे गटाला पुन्हा भगदाड पाडण्याचा हलचाली सुरू झाल्या आहेत. केवळ ठाकरे सेनाच नाही तर काँग्रेसला पण खिंडार पाडण्यात येणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. तर दुसरीकडे ठाकरे गोटातून ही संमिश्र प्रतिक्रिया आल्याने राज्यात राजकीय भूकंप होणार अशी चर्चा होत आहे. ठाकरे सेना फुटणार का यावर आता महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी कोल्हापूरमध्ये त्यांनी अनेक मुद्दांवर पत्रकार परिषदेत थेट मतं मांडली. त्यांनी यावेळी सामंत यांच्यावर निशाणा साधला.
उदय सामंत यांचा दावा काय?
विधानसभेतील दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरे गोटात अस्वस्थता आहे. शिवसेना ठाकरे गट पुन्हा फुटणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी दाओसनंतर मुंबईतही केला. उद्धव ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी होतील असा दावा त्यांनी केला. इतकेच नाही तर रत्नागिरीत त्याचा पहिला ट्रेलर दाखवणार असल्याचा अल्टिमेटम त्यांनी दिला. आज रत्नागिरीत पक्ष प्रवेशाची जय्यत तयारी सुद्धा सुरू झाली आहे.




दावोसला गुंतवणुकीसाठी गेले की पक्ष फोडण्यासाठी
या सर्व घडामोडी घडत असताना शरद पवार हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांनी आज सकाळीच पत्रकारांशी संवाद साधला. उदय सामंत यांच्या दाव्याविषयी विचारले असता, शरद पवार यांनी जोरदार कोपरखळी खेळली. उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला गुंतवणुकीसाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी गेले असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला अधिक गर्दी
काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतील दोन्ही गोटांनी वेगवेगळे मेळावे घेतले. बीकेसीमध्ये शिंदे सेनेचा तर अंधेरीत उद्धव ठाकरे गटाने मेळावा घेतला. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला तुलनेने अधिक गर्दी होती असे पवार म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीआधी शरद पवार यांचे हे वक्तव्य बरेच काही सांगून जाते, याची जाणकारांना कल्पना आलीच असेल.
निष्ठावंत सोडून जातील असे वाटत नाही
शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी जे बाळासाहेबांच्या विचारांशी निष्ठावंत आहेत, ते आता शिंदे गटात जातील असे वाटत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. विधानसभा निवडणुकीनंतरही आता महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वतंत्र लढण्याचा विचार करत असतील तर त्याविषयी महाविकास आघाडीत सामंजस्याने विचार करण्यात येईल असे ते म्हणाले.