मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या कट्टर समर्थकाला पोलिसांकडून थेट दिलासा, गोट्या गित्तेसह चार जणांवरील…
Beed Crime : बीड जिल्हातील गुन्हेगारी ही मागील काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. त्यामध्येच पोलिसांनी अनेक टोळ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. आता वाल्मिक कराड याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आणि बीड जिल्हातील गुन्हेगारी राज्यभर चर्चेत आली. मागील काही दिवस बीडमधील मारहाणीचे अनेक धक्कादायक व्हिडीओ पुढे आले. पोलिसांनी गुन्हेगाऱ्यांचा मुसक्या आवळण्यासाठी अनेक टोळ्यांवर मकोका अंतर्गत थेट कारवाई केली. परळी तालुक्यातील सहदेव सातभाई यांच्यावरील खुनाच्या प्रयत्नानंतर बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक असलेल्या रघुनाथ फडच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत थेट मकोका लावला. वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गित्ते याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.
आता पोलिसांनी मोठा निर्णय घेत चक्क रघुनाथ फडच्या टोळीमधील सात जणांपैकी पाच जणांवरील मकोका काढलाय. वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून ओळख असलेला आणि मागील काही महिन्यांपासून फरार असलेला गोट्या गित्ते यांच्यावरीलही मकोका काढण्यात आला. रघुनाथ फड टोळीवर सहदेव सातभाई यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा आरोप होता. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण लागल्यानंतर या टोळीतील पाच जणांवरील मकोका काढला आहे.
गोट्या गित्ते, संदीप सोनवणे, जगन्नाथ फड, विलास गित्ते आणि बालाजी गित्ते या पाच जणांवरील मकोका रद्द करण्यात आला. मात्र, पोलिसांनी अजून दोन जणांवरील मकोका रद्द केला नाहीये. काही दिवसांपूर्वीच गोट्या गित्ते याने रेल्वे पटरीवर बसून एक व्हिडीओ तयार केला होता. त्याने म्हटले होते की, आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाल्मिक कराडवर खोटे आरोप केले जात आहेत. यादरम्यान त्याने जितेंद्र आव्हाड यांच्यावरही आरोप केली होती.
हेच नाही तर माझ्या जीवाला काही झाले तर त्याला जितेंद्र आव्हाड जबाबदार असतील असे त्याने म्हटले होते. पोलिस मागील काही दिवसांपासून गोट्या गित्ते याच्या शोधात होती. मात्र, गोट्या गित्ते हा पोलिसांच्या काही हाती लागला नाही. तो सोशल मीडियावर व्हिडीओ तयार करून शेअर करताना दिसला. पोलिसांना काही प्रकरणात त्याची चाैकशी करायची होती. शिवाय आता त्याच्यावरील मकोकाची कारवाईही रद्द करण्यात आलीये.
