QRT टीम, विशेष कमांडो ट्रेनिंग; कोण आहेत अमोल वाघमारे ज्यांनी रोहित आर्याचा एन्काउंटर केला?
मुंबईच्या पवईमध्ये असलेल्या आरए स्टुडिओत रोहित आर्या याने काही मुलांना ओलीस ठेवलं होतं. अखेर पोलिसांकडून त्याचा एन्काउंटर करण्यात आला, पोलीस अधिकारी अमोल वाघमारे यांनी त्याच्यावर गोळीबार केला.

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. गुरुवारी रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीनं पवई येथील आरए स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या काही मुलांना ओलीस ठेवलं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, स्टुडिओला चारही बाजुनं पोलिसांनी वेढा टाकला, सुरुवातीला दीड ते पावनेदोन तास पोलिसांनी रोहित आर्या याच्याशी फोनवर संवाद साधून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकण्यास तयार नव्हता, अखेर पोलिसांनी स्टुडिओच्या दुसऱ्या बाजुने उंच शिडी आणून तिच्या मदतीनं बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओमध्ये प्रवेश केला.
पोलीस अधिकारी अमोल वाघमारे यांना पहाताच रोहित आर्या हा आपल्याकडे असलेलं शस्त्र काढण्याच्या तयारीमध्ये होता, तो मुलांना धोका पोहोचू शकतो याची खात्री पोलिसांना असल्यामुळे शेवटी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला, अमोल वाघमारे यांनी त्याच्यावर गोळीबार केला, यातच रोहित आर्या याचा मृत्यू झाला.
कोण आहेत अमोल वाघमारे?
रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे एपीआय अमोल वाघमारे गेल्याच महिन्यात पवई पोलीस ठाण्यात रुजू झाले आहेत. अमोल वाघमारे हे क्यूआरटी म्हणजे तात्काळ मदतीला धावून येणाऱ्या कमांडो टीममधले अधिकारी होते. वाघमारे यांनी कमांडो ट्रेनिंग घेतलं असल्यामुळे या ऑपरेशनसाठी आत जाण्याची परवानी त्यांना देण्यात आली. अग्निशमन दलाच्या उंच शिडीचा वापर करून बाथरूमची काच फोडून वाघमारे आत शिरले, त्यांनी रोहित आर्यावर गोळी झाडली, ज्यात रोहित आर्याचा मृत्यू झाला.
रोहित आर्या हा एका वेब सीरिजचं चित्रिकरण करत होता, या स्टुडिओमध्ये गेल्या पाच दिवसांपासून चित्रिकरण सुरू होतं. गुरुवारी या चित्रिकरणाचा सहावा दिवस होता, रोहित आर्या याने शंभर मुलांना ऑडिशनसाठी बोलावलं होतं, त्यातील 17 जणांना त्याने ओलीस ठेवलं तर बाकीच्यांना पुन्हा घरी पाठवलं, वेळ झाला तरी मुलं जेवण्यासाठी बाहेर आले नाहीत, त्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले, पोलिसांनी या मुलांच्या सुटकेचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये रोहित हा ऐकण्याचा मनस्थितीमध्ये नव्हता, अखेर मुलांना वाचवण्याच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
