Sanoth Pandit : तुरुंगातून बाहेर आल्यावर संतोष पंडित यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Santosh Pandit News : संतोष पंडित हे जेलमधून सुटले आहेत. त्यांना जामिनीवर सोडण्यात आलं आहे. त्यानंतर संतोष पंडित यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील युट्युबर संतोष पंडित यांची अखेर जामीनावर सुटका झाली आहे. जामिनावर सुटल्यानंतर यापुढेही लोकांच्या समस्या मांडत राहणार असल्याचे संतोष पंडित यांनी स्पष्ट केले. माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर माफी मागतो. परंतु या पुढे देखील संविधानिक अधिकार बजावत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संतोष पंडित म्हणाले, ‘जे काही झालं, ते शॉकिंग होतं. आता सर्व न्यायप्रविष्ठ आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी बाहेर आल्यानंतर फक्त महाराष्ट्र नव्हे, देशभरातून पाठिंबा मिळाला. माध्यमांनी देखील साथ दिली. मी जे काही कार्य करतो, तो माझा संविधानिक अधिकार आहे. त्याअंतर्गत अधिकार बजावत होतो. या पुढे देखील बजावत राहणार आहे. कायद्याच्या प्रक्रिया पार पडल्या आहेत. जे सर्व काही झालं, ते अचानक झालं. मला रात्री अचानक घेऊन गेले. त्यानंतर मला सर्व काही कळलं. मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही. देशभरातून मला साथ मिळाली, हे आता तासाभरात पाहिले. आता लगेच प्रतिक्रिया देणे, योग्य ठरणार नाही. माझ्यासोबत देशाची जनता आहे’
‘सुरू करताना कोणाला विचारलं नाही. तो माझा संविधानिक अधिकार असून यापुढे बजावत राहील. मी थांबणार नाही. आपण लोकशाहीत राहतो. जनता देशाची मालक आहे. जनतेला प्रश्न कोणाला विचारावे, आपण त्यांना निवडून देतो, त्यांना प्रश्न विचारायला हवे. मग कोणताही पक्ष असो. सत्ताधारी पक्षांना प्रश्न विचारले पाहिजे. सत्ताधारी नियम लादत असतील, तर त्यांनीही नियमांचं पालन करायलं हवं. मी वैयक्तिक टीका केली नाही. जे काही झालं, माझं चुकीचं करण्याचा हेतू नव्हता. सगळ्यात महत्त्वाचं, माझ्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. मी समाजकार्य करतो, असे समजू नका. मी माझा संविधानिक अधिकार बजावत आहे. तो मी बजावत राहणार. मी थांबणार नाही. मी जनतेसाठी जे योग्य ते बोलत राहणार आहे, असे पंडित यांनी स्पष्ट केले.
