Pune Liquor Case : विषारी दारूचे पुण्यात 15 बळी…आता सीआयडीची एंट्री, मोठी अपडेट काय ?
पुण्यातील हडपसर, काळेपडळ आणि पिंपरी-चिंचवड भागत विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. प्राथमिक तपासात अल्कोहोलमध्ये मिथेनॉल मिसळण्यात आल्याचे उघड झाले आहे. या केसमध्ये आता सीआयडीची एन्ट्री झाली आहे.

Pune Liquor Case: पुण्यातील विषारी दारू प्रकरणामुळे फक्त शहरच नव्हे तर अख्खा महाराष्टर हादरला आहे. पुण्यातील हडपसर, काळेपडळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात 10, तर हडपसर आणि काळेपळ परिसरात 5 जणांचा बळी गेला. तर इतर अनेक जण अजूनही रुग्णालयात दाखल असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान या विषारी दारू कांड प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, सीआयडीकडे आता तपास सोपवण्यात आला आहे. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. अवैधपणे उत्पादित केलेल्या या दारूमध्ये मिथेनॉल मिसळण्यात आल होतं, ज्यामुळे अनेकांचाजीव गेला, असं प्राथमिक तपासात उघड झालं. तपास यंत्रणांकडून आता पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पसरलेल्या अवैध दारूच्या नेटवर्कचा सखोल तपास केला जात आहे.
पोलिसांवर कारवाई काय ?
दरम्यान, फुगेवाडी विषारी दारूच्या दुर्घटनेत 10 जणांच्या मृत्यूनंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करत दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांना निलंबित केलं आहे. तपास पथकाच्या प्रमुखांसह इतर चार पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
एवढंच नव्हे तर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांचीही पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचे आढळलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला सोडलं जाणार नाही, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिलाय.
कसा व्हायचा दारूचा सप्लाय ?
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध दारूचं हे संपूर्ण जाळं पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पसरलं होतं. पुणे शहरातील हवेली तालुक्यातील उर्ली कांचन गावचा रहिवासी असलेल्या राधेश्याम प्रजापतीने कथितरित्या विषारी दारू तयार केली होती. ही दारू नंतर आरोपी योगेश वानखेडे याला पोहोचवण्यात आली, असं आतापर्यंतच्या तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश वानखेडेने ही दारू खरेदी करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध अवैध दारूच्या अड्ड्यांवर पुरवली. मात्र त्यापूर्वी त्याने त्यात मिथेनॉल मिसळलं होतं.
योगेश वानखेडे हा एक व्यावसायिक दारू तस्कर आणि अवैध विक्रेता आहे, असा पोलिसांचा दावा आहे. त्याच्या विरोधात दारू तस्करीशी संबंधित तीन गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये आधीच दाखल करण्यात आले आहेत. पोलीस सध्या संपूर्ण नेटवर्कचा तपास करत असून, या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे.
