Ajit Pawar Plane Crash : …तर टळला असता अजित पवारांच्या विमानाचा अपघात, नवी माहिती समोर
अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. ते मुंबईवरून बारामतीला निघाले होते. विमान लँड होण्यापूर्वीच विमानाने नियंत्रण गमवलं, त्यानंतर ते जमिनीवर येऊन धडकलं, आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना आज घडली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. अजित पवार हे मुंबईहून बारामतील निघाले होते. मात्र विमान धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाने नियंत्रण गमावलं आणि हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पहायला मिळत आहे. अनेक नेते देखील आता बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उद्या बारामतीमध्ये येणार आहेत. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत आता एव्हियशन एक्स्पर्ट विशाल बांगरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले विशाल बांगरे?
ज्या विमानाचा अपघात झाला, ते विमान बंबार्डियरचं लियरजेट विमान होत, यापूर्वीही अनेकदा या विमानातून अजित पवारांनी प्रवास केला होता. जे काही मेट्रोलॉजीमधून माहिती मिळाली त्यानुसार विझिबिलिटी कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. पायलटने सुरक्षेच्या दृष्टीने व्हीआयपी ऑन बोर्ड असताना दक्षता घेतली होती, आधी विमानाचा एक राऊंड घेतला नंतर लँडिंगचा प्रयत्न केला, पायलटने ‘मेडे’ कॉल देखील दिला होता, परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाते तेंव्हाच पायलट मेडे कॉल देतो.
पायलटला त्यावेळी जी गोष्ट योग्य वाटली, ती त्याने केली, त्यावेळी त्याने तो निर्णय घेतला. हवामानाची परिस्थिती तशी बदलत असते, त्याप्रमाणे धुक्यामुळे व्हिजिबिलिटी कमी असल्यानं त्याने लँडिंग केल्याचा प्रयत्न प्रथमदर्शनी दिसून येत आहे, उड्डाणापूर्वी विमानाच्या प्रत्येक गोष्टी चेक केल्या जातात, पायलट स्वत: विमान चेक करतो, सगळे क्लियरन्स मिळाल्याशिवाय विमानाचं उड्डाण करता येत नाही, अशी माहिती विशाल बांगरे यांनी दिली आहे. दरम्यान जर विझिबिलिटी स्पष्ट असती तर कदाचित हा अपघात टळला असता अशी आता या अपघातानंतर तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे.
