आंदोलनाला अजून 9 दिवस आहेत, मार्ग निघेल; अजित पवारांचे संकेत

आम्ही सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही तर 7 जून रोजी मी स्वत: आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी दिला आहे. (ajit pawar reaction on Sambhaji Chhatrapati's deadline to maha vikas aghadi)

आंदोलनाला अजून 9 दिवस आहेत, मार्ग निघेल; अजित पवारांचे संकेत
अजित पवार, उपमुख्यमंत्री

पुणे: आम्ही सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही तर 7 जून रोजी मी स्वत: आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी दिला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाला अजून 9 दिवस बाकी आहेत. तोपर्यंत मार्ग निघेल, असे सूचक संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. (ajit pawar reaction on Sambhaji Chhatrapati’s deadline to maha vikas aghadi)

अजित पवार यांनी पुणे विभागाची कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी हे सूचक संकेत दिले. संभाजी छत्रपती यांनी येत्या 7 जून रोजी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबत पवारांना विचारण्यात आले असता. आंदोलनाला अजून वेळ आहे. अजून 9 दिवस बाकी आहे. तोपर्यंत मार्ग निघेल. या नऊ दिवसात खूप काही होईल. चर्चा होईल, मार्ग निघेल, असं पवार म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजेंना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. काही लोकांना आंदोलन करण्याची हौस असते. संभाजीराजेंबद्दल मी बोलत नाही. कुणी आंदोलन केलं की हे लोक त्याला पाठिंबा देतात. अरे पण आंदोलन कशासाठी आहे? का आहे? मार्ग काही निघतो का? याची काहीच माहिती हे लोक घेत नाहीत, असा टोला त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नाव न घेता लगावला.

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन चंद्रकांतदादांनी केलंय. तर मग आम्हा सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल. कारण आम्हीही मराठाच आहोत, असा चिमटा त्यांनी चंद्रकांतदादांना काढला.

ना नाराजी, ना तक्रार

यावेळी त्यांनी आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या कुरबुरीच्या वृत्ताचाही इन्कार केला. आघाडी सरकारमध्ये कोणतीही नाराजी नाही आणि कुणाच्याही तक्रारी नाही. आघाडीचा कारभार चांगला सुरू आहे. सगळं व्यवस्थित सुरू आहे. कुठल्याही बाबतीत काहीही झालं नाही. शरद पवार साहेब जसा वेळ देतात, तसं मी त्यांना भेटतो. तक्रारी आणि कुरबुरीच्या बातम्या पेरल्या जात आहेत, असंही ते म्हणाले.

वारीचा निर्णय अद्याप नाही

वारीबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. वारकरी जे सांगतील तो निर्णय घेऊ. कॅबिनेटच्या बैठकीत वारीबाबत चर्चा करू. मुख्यमंत्रीच या प्रश्नावर अंतिम निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

22 हजार कोटी यायचे बाकी

आज 11 वाजता जीएसटीची बैठक सुरू झाली. जीएसटीमध्ये एकूण 18 विषय होते. कोरोना काळात लागणाऱ्या गोष्टींवर सवलत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. थकबाकीबाबतचा मुद्दा अजून आलेला नाही. 46 हजार कोटी रुपये यायचे होते. त्यातील 24 हजार कोटी रुपये मिळाले. अजून 22 हजार कोटी रुपये यायचे बाकी आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (ajit pawar reaction on Sambhaji Chhatrapati’s deadline to maha vikas aghadi)

 

संबंधित बातम्या:

Sambhajiraje Chhatrapati : “6 जूनपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा रायगडावरून आंदोलन करणार अन् मी स्वत: आंदोलनात उतरणार”

ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग शक्य आहे का?, ठाकरे, पवार, फडणवीस, चव्हाणांनी सांगावं; खासदार संभाजी छत्रपतींचं आवाहन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI