Baba Adhav: कष्टकऱ्यांच्या बाबांना आज अखेरचा निरोप; मार्केट यार्डमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी, धार्मिक विधीविना अंत्यसंस्कार
Baba Adhav Passed Away: कष्टकऱ्यांचे नेते, ज्येष्ठ समाजवादी डॉ. बाबा आढाव यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्यावरती आज मंगळवारी 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Baba Adhav: महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समर्थ वारसा चालवणारे ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांचे काल 8 डिसेंबर रोजी निधन झाले. गेल्या बारा दिवसापासून पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांना उपचारासाठी दाखल केलेले होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. त्यानंतर त्यांची किडनी फेल झाली. रात्री 8.25 वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झालं. त्यांच्या निधनामुळे समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचा समर्थ वारसा त्यांनी चालवला. अनेक चळवळी आणि आंदोलनं केली. महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्यासाठी त्यांचं योगदान अतुलनिय आहे. असंघटित कामगारांसाठी त्यांनी मोठं काम केलं.
पार्थिव अंत्यदर्शनासाठी
आज 9 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शिलाताई, मलुं असीम, अंबर, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बाबा आढाव यांचा जीवनपट
बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असे आहे. सामाजिक कार्य, कामगार चळवळ, साहित्य या क्षेत्रात त्यांनी अमीट छाप सोडली आहे. प्रामुख्याने असंघटित कामगारांसाठी केलेल्या कार्यामुळे ते राज्यातच नाही तर देशात ओळखले जातात. सामाजिक वीण उसवू नये यासाठी त्यांनी केलेल्या चळवळी आणि आंदोलनं आणि उपक्रमांना समाजानंही साथ दिली. सामाजिक कार्य आणि चळवळ
असंघटित कामगार: त्यांनी रिक्षाचालक, हमाल, हातगाडी ओढणारे आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला.
’पुणे शहराचे कुटुंब प्रमुख’: पुणे शहरात त्यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्यांना आदराने ‘पुणे शहराचे कुटुंब प्रमुख’ असेही म्हटले जाते.
प्रमुख संस्था: त्यांनी पुणे येथे ‘हमाल पंचायत’ आणि ‘असंघटित कामगार कर्मचारी महासंघ’ यांसारख्या संस्था स्थापन केल्या.
’एक गाव, एक पाणवठा’: अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ सुरू केली, जी अत्यंत गाजली.
दलित वस्ती सुधार योजना: त्यांनी दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठीही काम केले. साहित्य: बाबा आढाव यांनी सामाजिक विषयांवर आणि आपल्या चळवळींवर आधारित अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत.
