वसंत मोरे यांना पुण्यातून वंचितची उमेदवारी, सुप्रिया सुळेंना पाठिंबा; आनंदराज आंबेडकर अजूनही तिकीटापासून ‘वंचित’?
वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातील उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे वंचितकडून बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातील उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचीदेखील भेट घेतली होती. पण काँग्रेसकडून पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यानंतर वंसत मोरे वंचितच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. वसंत मोरे यांनी वंचितच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज भरला तरी त्यांचं स्वागत असेल, असं धंगेकर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर आज अखेर याबाबतच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून याआधी 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज वंचितकडून आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. वंचितच्या आजच्या यादीत पुण्यातून वसंत मोरे, नांदेमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले आणि शिरुर मतदारसंघातून मंगलदास बागूल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधून अफसार खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचितने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केली आहे.
आनंदराज आंबेडकर अजूनही तिकीटापासून ‘वंचित’?
वंचितकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा धडाका सुरु असला तरी एक महत्त्वाचा प्रश्न प्रकर्षाने उभा राहतोय. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीतून उमेदवारी अर्ज आज भरला आहे. पण त्यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आनंदराज आंबेडकर हे वंचितच्या तिकीटापासून अजूनही वंचित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
संभाजीनगरमध्ये आंबेडकरांची मोठी खेळी
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी वंचितची आणि एमआयएम पक्षाची युती होती. दोन्ही पक्ष एकत्र असल्याने सध्याचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना त्याचा चांगला फायदा झाला होता. या समीकरणामुळे संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक असा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. पण या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा उमेदवार जाहीर केलाय. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना यावेळी मुस्लिम समाजाचा उमेदवार जाहीर केलाय. याचा फटका एमआयएमला नक्कीच बसण्याची शक्यता आहे.