आरएसएस महिलेला सरसंघचालक करणार का? पृथ्वीराज चव्हाण यांचा रोखठोक सवाल; भाजपची कोंडी?
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) महिला सरसंघचालक बनवण्याबद्दल थेट सवाल केला आहे. भाजपने राहुल गांधींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, चव्हाण यांनी महिला आरक्षणासाठी काँग्रेसच्या पाठिंब्याची आठवण करून दिली. महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलेला सरसंघचालक करणार का? असा सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी थेट संघ आणि भाजपला हा सवाल करून कोंडी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला. जेव्हा महिलांना संधी देण्याची वेळ होती, तेव्हा राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींना संधी का दिली नाही? असा सवाल करत भाजपने राहुल गांधींच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. त्याला प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हा सवाल केला आहे.
काँग्रेस महिला आरक्षणाला विरोध करत आहे हे कोणत्या मूर्खाने सांगितलं हे अगोदर बोलावं. 2023मध्ये जेव्हा घटना दुरुस्ती विधेयक आणले तेव्हा आम्ही त्याला पाठिंबा दिला होता. महिला आरक्षणाचे जनकच आम्ही आहोत, असं सांगतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलांना सरसंघचालक करणार का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
राज्याचे विषय जाणून घेतले
नाशिकमध्ये काँग्रेसचे 10 दिवसापासून शिबीर सुरू आहे. त्याच्या समारोपाला राहुल गांधी आले आहेत. त्यांनी राज्यातील नेत्यांसोबत बैठक घेतली. त्यांना राज्यातील विविध विषय सांगण्यात आले. कुंभमेळा, शक्तिपीठ मार्ग, शेतकरी समस्या आदी विविध विषय त्यांना अवगत करून देण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
पेपरफुटीला भाजप नेते जबाबदार
यावेळी चव्हाण यांनी राज्यातील पेपरफुटीवरही प्रतिक्रिया दिली. प्रत्येक पेपर फुटतो आणि त्याला भाजपचे ज्येष्ठ नेते जबाबदार असतात. पेपर दोन-दोन कोटीला विकला जातो. कोणालाही शिक्षा होत नाही. हे प्रकरण सीरिअस घ्या. कोणाला तरी शिक्षा झाली पाहिजे, असंही ते म्हणाले.
सर्वच रस्ते खड्डेमय
नाशिकमध्ये येत असताना राहुल गांधी यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सगळेच रस्ते खड्डेमय झाले आहेत. कुंभमेळ्याच्या प्रोजेक्टचा रिपोर्ट आलेला नाही. 40-40 टक्के कमिशन घेतले जात आहेत. शक्तिपीठ मार्गात देखील कमिशन घेण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. राहुल गांधी यांनी महिलांना संधी देण्याची वेळ असताना आपल्या बहिणीला संधी का दिली नाही? असा सवाल भाजपकडून केला जात आहे.
