
Pune News : पार्थ पवार यांच्या कंपनीचा कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार राज्यात गाजत असतानाच पुण्यात दुसरा मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. यामुळे प्रशासनापासून ते राजकारणात भूंकप आला आहे. पुण्यात एकामागून एक जमीन घोटाळे समोर येत आहेत. राजकीय वरदहस्ताशिवाय इतके धाडस भुरटे जमीन माफिया करू शकणार नाही असा पुणेकरांचा सूर आहे. पार्थ पवार अडचणीत आलेल्या जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचा अजून एक कारनामा समोर आला आहे.
शीतल जमीन माफिया?
पार्थ पवार अडचणीत आलेल्या जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानीचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. शीतल आणि तिचे पती सागर सुर्यवंशीने बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलली, यातून तब्बल 41 कोटींची रक्कम इतरत्र गुंतवली होती. पिंपरी चिंचवड मधील सेवा विकास बँकेतील या घोटाळ्याप्रकरणी सागरला सीआयडी, पिंपरी चिंचवड पोलीस आणि ईडी कडून अटक झाली होती. शीतलने मात्र अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यामुळं शीतलने केवळ जमीन व्यवहार प्रकरणात नव्हे तर कर्ज प्रकरणात ही फसवणूक केल्याचं समोर आलंय.
कृषी खात्याच्या जमिनीवरच डोळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 अंतर्गत महानगरपालिका क्षेत्र नसतानाही बोपोडी येथे हा जमीन अपहार करण्यात आला. 5 एकर जमीन घशात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही जमीन 1883 पासून कृषी खात्याकडे होती. शासनाच्या ताब्यात असताना आणि वहिवाट असतानाही हा जमीन घोटाळा करण्याची मजल लँड माफियांनी मारली. त्यामुळे यामागे मोठे राजकीय पाठबळ असल्याचे समोर येत आहे. शीतल तेजवानी आणि तिचे या प्रकरणातील सर्व भागीदारांची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी सुरु केली आहे. तिने अजून कुठे जमीन घोटाळे केले हे समोर येणे आवश्यक असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
खडक पोलीस ठाण्यात गुन्हा
याप्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शीतल तेजवानी आणि द्विग्विजय पाटील या सर्व 9 जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार प्रविण चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती. 12 फेब्रुवारी 2024 ते 1 जुलै 2025 या दरम्यान हा कारनामा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.