Ambadas Danve : तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? अंबादास दानवेंनी नेमका घाव घातला, पार्थ पवार जमीन व्यवहारावरून अजितदादांविरोधात सेनेचे तोफ धडाडली
Ambadas Danve on Ajit Pawar : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणात यंत्रणा, प्रशासनाची भूमिका संशयास्पद असतानाच आता विरोधकांच्या हाती मोठे कोलीत आले आहे. अजितदादांनी याप्रकरणात कानावर हात ठेवताच उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर तोफ डागली.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका जमीन खरेदी प्रकरणात घोटाळ्याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत आले आहे. याप्रकरणात इतर सहभागीदारांवर गुन्हा दाखल झाला असला तरी पार्थ यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही. तर इतके मोठे कांड झाले असले तरी अजितदादांनी आपला या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नसल्याचे वक्तव्य केले. पालकमंत्र्यांनीच हात झटकल्यानंतर उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आज त्यांच्यावर मोठा निशाणा साधला.
कोरेगाव पार्कमधील ४०० एकर जमीन व्यवहार प्रकरणात अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या ३०० कोटींमध्ये खरेदी केली. या जमिनीचा बाजारभाव अंदाजे १८०० कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले. सरकारचा २१ कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी कालपासून विरोधकांनी अजित पवार, पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पार्थ पवार यांनी याप्रकरणात कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे सांगत सविस्तर भूमिका मांडण्यास नकार दिला. तर काल अजितदादांनी कानावर हात ठेवले. मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही… आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत..
तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना?
बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 7, 2025
अजितदादांनी राजीनामा द्यावा
मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? असा सवाल अंबादास दानवे यांनी अजितदादांना केला. बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्यावा अशी मागणी दानवेंनी केली. त्यांनी त्यासाठी एकनाथ खडसे यांचा दाखला दिला.
कोरेगाव पार्क प्रकरणात गुन्हा दाखल तर झाला पण या मध्ये पार्थ पवार अथवा त्यांच्या कंपनीचे नाव साफ साफ वगळण्यात आले! म्हणजे सरकारचे जादूचे प्रयोग सुरू झाले आहेत.. ते ही प्रकरण उघडकीस आल्याच्या अवघ्या २४ तासात.. असं नाही चालणार मुख्यमंत्री @Dev_Fadnavis महोदय..
या विषयाची चौकशी…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 6, 2025
समिती नेमा
न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी. अशी आमची स्पष्ट मागणी आहे असे अंबादास दानवे यांनी सांगितले. कोरेगाव पार्क प्रकरणात गुन्हा दाखल तर झाला पण या मध्ये पार्थ पवार अथवा त्यांच्या कंपनीचे नाव साफ साफ वगळण्यात आले! म्हणजे सरकारचे जादूचे प्रयोग सुरू झाले आहेत अशी टीका त्यांनी केली, ते ही प्रकरण उघडकीस आल्याच्या अवघ्या २४ तासात गुन्हा दाखल झाला आणि पार्थचे नाव वगळलं हे असं नाही चालणार नाही असे दानवेंनी ठणकावले.या विषयाची चौकशी करणारे अधिकारी विकास खार्गे निश्चितच स्वच्छ प्रतिमेचे आहेत. पण प्रकरणात गुंतलेली नावे पाहता यामध्ये कडक बाण्याचे एक निवृत्त न्यायमूर्तीही सरकारने द्यायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली.
