आधी एबी फॉर्म खेचला, मग फाडून खाल्ला अन् नंतर थेट… पुण्यात शिंदे गटाच्या उमेदवाराने असं का केलं?
पुण्यात उमेदवारी अर्जावरून टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला असून एका उमेदवाराने चक्क प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म फाडून खाल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणासह अहिल्यानगरमधील तांत्रिक लढाईचा संपूर्ण आढावा येथे वाचा.

राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्यावरुन राजकीय राडा सुरू झाला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पुण्यात शिवसेनेच्या उमेदवाराने रागाच्या भरात चक्क दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म फाडून खाल्ल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तर अहिल्यानगरमध्ये तांत्रिक लढाईनंतर भाजप उमेदवाराचा अर्ज वैध ठरला आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भाजपासोबत युतीची चर्चा फिसकटली आहे. ही चर्चा फिसकटल्यानंतर प्रेशर टॅक्टिक म्हणून अनेक प्रभागात सरसकट फॉर्मचे वाटप केले. मात्र, एकाच वॉर्डमध्ये किती लोकांना फॉर्म दिले, याची चाचपणी न केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. प्रभाग क्रमांक ३६ मध्ये शिवसेनेचे दोन जुने नेते उद्धव लहू कांबळे आणि मच्छिंद्र कांबळे या दोघांनाही पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला होता.
मच्छिंद्र कांबळे यांनी वेळेआधीच निवडणूक कार्यालयात जाऊन आपला फॉर्म सादर केला. त्यानंतर उद्धव कांबळे जेव्हा अर्ज भरण्यासाठी पोहोचले, तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, शिवसेनेचा अधिकृत अर्ज आधीच जमा झाला आहे. हे ऐकून उद्धव कांबळे यांचा पारा चढला. उद्धव लहू कांबळे यांनी मच्छिंद्र कांबळे यांचा तो अधिकृत एबी फॉर्म हिसकावून घेतला आणि चक्क फाडून खाऊन टाकला. तसेच कोणालाही तो फॉर्म परत मिळवता येऊ नये आणि कोणी पकडू नये म्हणून त्यांनी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या शौचालयात जाऊन स्वतःला लपवून घेतले. सध्या या घटनेची चर्चा संपूर्ण पुण्यात रंगली आहे.
याप्रकरणी उद्धव लहू कांबळे यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. शासकीय कागदपत्रांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी आणि निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्यामुळे आता उद्धव लहू कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगरमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण
तर दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये अर्ज छाननीच्या दिवशी प्रचंड तणावाचे वातावरण होते. प्रभाग क्रमांक १५ मधील भाजपच्या उमेदवारांच्या अर्जांवर विरोधकांनी हरकती घेतल्या होत्या. भाजपचे उमेदवार दत्ता गाडळकर यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार आदेश जाधव यांनी आक्षेप घेतला होता. गाडळकर यांनी आपली संपत्ती लपवली असल्याचा दावा जाधव यांनी केला होता. या हरकतीवर निकाल मिळवण्यासाठी तब्बल ७ ते ८ तास दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. अखेर मध्यरात्री १२ वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी गाडळकर यांच्यावरील हरकती फेटाळून लावल्या आणि त्यांचा अर्ज वैध ठरवला. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून गाडळकर यांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
