पुण्यातील सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी, महापालिकेचे आदेश

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करण्यात यावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे. (Pune society Ban  outsiders)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:38 AM, 15 Apr 2021
पुण्यातील सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी, महापालिकेचे आदेश
पुणे पालिकेचे 'कोविड शववाहिनी ॲप

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसेच नियमित सोसायटीमध्ये येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे, असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत. (Pune society Ban on entry of outsiders order by Municipal Corporation)

नियमित येणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी

पुणे शहरासह जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. यामुळे पुणे महापालिका प्रशासनाकडून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सोसायटी व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच, सोसायटीमध्ये नियमित येणाऱ्या कामगारांची कोरोना (आरटीपीसीआर) चाचणी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उद्यान आणि आवारातही फिरण्यासही प्रतिबंध

गृहनिर्माण सोसायटीने याबाबत सोसायटीच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोसायटीमध्ये नियमित येणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी करण्यात यावी. तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करण्यात यावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान गृहनिर्माण सोसायटीमधील जिम, स्वीमिंग पूल आणि क्लब हाऊस वापरण्यास यापूर्वीपासूनच प्रतिबंध करण्यात आले आहेत. आजपासून 1 मेपर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. या कालावधीत सोसायटीतील नागरिकांना उद्यान आणि आवारातही फिरण्यावर प्रतिबंध राहणार आहे. तसेच या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती

पुणे शहरात काल दिवसभरात 4 हजार 206 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 895 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. पुण्यात काल 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 53 हजार 326 सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील 1 हजार 158 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

कालच्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 44 हजार 29 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 84 हजार 801 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 902 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोना स्थिती काय?

काल दिवसभरात 58 हजार 952 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या 24 तासांत 39 हजार 624 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 35 लाख 78 हजार 160 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 29 लाख 5 हजार 721 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 58 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 12 हजार 70 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. (Pune society Ban  outsiders order by Municipal Corporation)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update : चिंता कायम; राज्यात दिवसभरात 58 हजार 952 नवे कोरोना रुग्ण, 278 जणांचा मृत्यू

Pune Lockdown : राज्य सरकारचं पुण्याकडे साफ दुर्लक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा गंभीर आरोप

Lockdown: पुण्यातील व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकारविरोधात एल्गार; लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाण्याचा इशारा