राज ठाकरे आणि फडणवीस यांचे जिव्हाळ्याचे संबंध; संजय राऊत यांनी फोडला बॉम्ब, काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावर संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि फडणवीस यांचे 'जिव्हाळ्याचे संबंध' असल्याची मिश्किल टिप्पणी केली. राऊत यांनी लोकसेवा आयोगात संघाची माणसे भरल्याचा आरोप करत फडणवीसांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याचे आवाहन केले.

सुनील थिगळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आदोलन सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार असल्याचा शब्द विद्यार्थ्यांना दिला होता. त्यानुसार राज ठाकरे यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून चर्चा केली. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता, राज ठाकरे आमि देवेंद्र फडणवीस यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. राऊत यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
खासदार संजय राऊत हे पुण्यात आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. कदाचित मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यांचं ऐकत नाही, पण राज ठाकरेंचं ऐकतील. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल, असं मिश्किल विधान संजय राऊत यांनी केलं.
फडणवीस यांनी समजून घ्यावं
पुण्यामध्ये एमपीएससीचं आंदोलन सुरू आहे. लोकभावनेचा उद्रेक आहे. न्यायालयाच्या निकालाने प्रश्न सुटले असते तर या देशात अबादी अबाद असते. न्याय व्यवस्थेत भाजपने आपली माणसं घुसवली आहेत. हजारो विद्यार्थी जेव्हा आंदोलन करत आहेत. हजारो विद्यार्थी जेव्हा दिवस-रात्र तिथे बसलेत, उपाशी राहतायत, संघर्ष करतायत, घरदार सोडून तिथे बसले आहेत. त्यांच्या भावना न्यायालयाने समजून घेतल्या पाहिजे. फडणवीस यांनी समजू घेतल्या पाहिजे आणि त्यानुसार कारवाई केली पाहिजे, असं राऊत म्हणाले.
लोकसेवा आयोगात संघाची माणसं
लोकसेवा आयोगात (UPSC/MPSC) गेली अनेक वर्षे प्रशासनामध्ये, नोकऱ्यांमध्ये एका विशिष्ट विचारांची माणसं यावीत यासाठी लोकसेवा आयोगाचा गैरवापर करण्यात आला. पेपर फोडण्यात आले आहेत. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामध्ये जे 8 लोक महाराष्ट्रातून पकडलेले आहेत, हे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपशी संबंधित आहेत. लोकसेवा आयोगात सुद्धा त्याच पद्धतीचे लोक देवेंद्र फडणवीस यांनी भरलेले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरेंचं ट्विट काय?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नवार चर्चा केल्याचं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. एमपीएससीच्या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी आज सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
