मोठी बातमी! शरद पवारांचा थेट अजितदादांना फोन, नेमकी काय झाली चर्चा?
शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आहे. पुरंदरमधील शेतकरी शरद पवारांच्या भेटीला आले होते, त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन केला.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटात देखील हालचालींना वेग आला होता. अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, हर्षवर्धन सपकाळ यांच्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर हे देखील शरद पवारांना भेटले होते. या भेटीगाठीमुळे चर्चेला आणखी उधाण आलं.
मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना चर्चेला पूर्णविराम दिला. “आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा वरिष्ठ पातळीवर तशी कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे आज हा प्रश्न उद्भवत नाही”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं. सुनील तटकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आहे. पुरंदरमधील शेतकरी शरद पवारांच्या भेटीला आले होते, त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन केला. शरद पवार यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता, मात्र ते एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये असल्यानं शरद पवार यांचं त्यांच्याशी बोलणं झालं नाही, त्यानंतर शरद पवार यांनी लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, त्यासंदर्भात बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावा, असं शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन करून सांगितल्याची माहिती समोर येत आहे.
आज पुरंदरमधील शेतकऱ्यांनी आपल्या काही प्रश्नांसाठी शरद पवार यांची भेट घेतली, त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन करून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा असं म्हटलं.
