TV9 special:शरद पवारांची पुन्हा एकदा महाराष्ट्राला ‘हूल’ की भाजप, ब्राह्मण संघटनांची उगाचीच ‘भूल’?

TV9 special:शरद पवारांची पुन्हा एकदा महाराष्ट्राला 'हूल' की भाजप, ब्राह्मण संघटनांची उगाचीच 'भूल'?
शरद पवारांकडून दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन
Image Credit source: TV9

शरद पवार काहीही करतात तर त्याचे काही अर्थ असतात असे मानले जाते. पवारांनी आज पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात आत न जाता बाहेरुनच दर्शन घेतले. याचेंही अनेक अर्थ लावले जात आहेत. यात काय असतील पवारांचे संकेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

May 27, 2022 | 7:12 PM

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे (Dagdushet Ganpati Mandir)मंदिरात न जाता बाहेरुनच दर्शन घेतले (Darshan from outside the temple)आणि त्यानिमित्ताने अनेक चर्चांना पुन्हा एकदा तोंड फुटलं. शरद पवार काहीही करतात तर त्याचे काही अर्थ असतात असे मानले जाते. गेल्या काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांनी राज्यात जातीयवाद पसरवला असा थेट आरोप करत त्यांच्या हिंदुत्वावरही बोट ठेवलं होतं. शरद पवार हे नास्तिक आहेत, अशी टीकाही त्यांनी भर सभेत केली होती. त्यांचा मंदिरात गेलेला फोटो क्वचित दिसेल असे सांगत याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी हे लोकसभेत मान्य केल्याची साक्षच राज ठाकरेंनी या सभेत काढली होती. त्यानंतर शरद पवारांनी आपण अस्तिक असल्याचे आणि मंदिरात जात असल्याचेही सांगितले. त्यानंतर अमोल मिटकरी वादग्रस्त प्रकरण, केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट प्रकरणानंतर शरद पवारांनी ब्राह्मण संघटनांची भेटही घेतली. ब्राह्मण संघटनांनाच आपल्याला भेटायचे होते, असेही या भेटीनंतर पवारांनी सांगितले. अस्वस्थता दूर करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत, ब्राह्मण आरक्षणाच्या मुद्दा होता की नव्हता, यावरुन वादंग रंगला. पुन्हा एक नवीन अस्वस्थता निर्माण झाली. यातच पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराच्या १२५ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने पवारांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले पण ते बाहेरुनच.. या त्यांच्या कृतीवरुनही त्यांनी दिलेल्या संकेताची चर्चा होते आहे.

पूर्वनियोजित दर्शनाचा होता कार्यक्रम पण..

खरंतर शरद पवार हे पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनाला जाणार आहेत, ही माहिती आधीच माध्यमांना कळवण्यात आली होती. म्हणजे हा त्यांचा दर्शनाचा दौरा पूर्वनियोजित होता. त्यांच्या या दर्शनावर ब्राह्मण संघटनेच्या आनंद दवे यांनी दुपारी भक्त देवळात येणार असल्याचे समाधान व्यक्त केले होते. पवार दगडूशेठचे गणपती दर्शन घेणार याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली, त्यासोबतच केवळ इफ्तार पार्टी करणारे पवार आता मंदिरात जात आहेत, हे आम्हाला याची देही, याची डोळा पाहायला मिळत आहे, याबद्दल गणपतीचे आभार, असा पुणेरी टोला मारण्याची संधीही दवे यांनी सोडली नाही.

पवारांच्या कार्यक्रमात झाला ऐनवेळी बदल

हे एवढं घडायच्या काही काळातच दुपारच्या सुमारास शरद पवार हे गणपती मंदिरानंतर महात्मा फुले यांचे निवासस्थान असलेल्या भिडे वाड्यातही जाणार आहेत, अशी माहिती माध्यमांना देण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सुमारास शरद पवार आले खरे पण ते पहिल्यांदा गेले ते भिडे वाड्यात. भिडे वाड्याची पाहणी करुन परतताना शरद पवार दगडूशेठ मंदिराच्या परिसरात आले.

दगडूशेठ गणपती मंदिराचे दर्शन मात्र बाहेरुनच

दगडूशेठ मंदिर हे पुण्याचे मानाचे ठिकाण मानले जाते. त्या ठिकाणी शरद पवार आल्यानंतर ते आत जाऊन दर्शन घेतील अशी अपेक्षा होती, मात्र पवारांनी गणपतीचे दर्शन बाहेरुनच घेतले. मांसाहार केला असल्यामुळे मंदिरात जाऊन दर्शन घेतले नाही, असे कारण त्यांनी यासाठी सांगितले. स्वाभाविकच दौरा पूर्वनियोजित असताना, ऐनवेळी हा बदल कसा असा प्रश्न अनेकांना पडला. यावर ब्राह्मण संघटनेचे दवे यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली. मांसाहर केला म्हमून मदिरात न जाणं ही सात्विकतेची आणि भाविकतेची सर्वोच्च पायरी आहे, असे ते म्हणाले. एखादा खट्टर भक्तच असे करु शकतो, असे सांगत त्यांनी पवारांच्या भूमिकेचं स्वागतच केलं.

मंदिरात गेलं तरी प्रॉब्लेम आणि नाही गेलं तरी- अजित पवार

शरद पवारांच्या या बाहेरुन दर्शनाबाबत जेव्हा अजित पवारांना विचारणा करण्यात आली, तेव्हा ते त्यांच्या शैलीत म्हणाले, मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तरी प्रॉब्लेम आणि बाहेरुन घेतलं तरी. संविधानाने कुठंही जाण्याचा अधिकार दिला आहे, असे अजितदादा म्हणाले. काहीजण बाहेरुनच दर्शन घेतात, नाही गेलं तर म्हणतात, नास्तिक आहेत आणि गेलं तरी अडचण. मात्र बाहेरुन नमस्कार करायला काय अडचण आहे, असा प्रतिप्रश्नच त्यांनी उपस्थित केलाय.

मौलाना पवारांचा आज जुम्मा -भाजपा

शरद पवार यांच्या या कृतीवरुन भाजपाने टीका करण्याची संधी सोडली नाही. मौलाना पवार यांचा आज जुम्मा होता, अशी टीका भाजपा आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी केली आहे. पवारांची ही खेळी काय आहे असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

आत जाऊन दर्शन घेतले असते तर अधिक आनंद- मनसे

शरद पवार यांचा नास्तिककडेून आस्तिकतेचा प्रवास सुखकर असल्याची प्रतिक्रिया मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिली आहे. शरद पवार यांनी बाहेरुन दर्शन न घेता गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले असते तर अधिक चांगले झाले असते, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पवारांचे नेमके संकेत काय

आता शरद पवारांनी हे सगळं का केलं, आणि यामागचा उद्देश का, की हे अगदी सहज होतं, याचा अर्थ ज्यांना लागायचा त्यांना लागला असेल. पण सामान्यांना याचा उलगडा इतक्यात होणे तसे अवघडच. मात्र आस्तिक-नास्तिक वाद, हिंदुत्वाचे वाढते प्रस्थ या सगळ्यात शरद पवारांनी दिलेली ही हुल म्हणायची की आणखी काही, याचा उलगडा एवढ्यात होणे कठीणच.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें