Ajit Pawar : कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

Ajit Pawar : कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा

यंत्रणांनी लसीकरणावर भर द्यावा असे निर्देश देऊन नागरिकांनी मास्कचा वापर करावा, योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 19, 2022 | 8:44 PM

बारामती : कोरोना संसर्गाची तिसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना नियमांची अंमलबजावणी कडकपणे करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. दरम्यान बारामती परिसरात सुरू असणारी विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामती परिसरातील विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, पुणे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.

तिसरी लाट थोपवण्यासाठी कोरोना नियमांची अंमलबजावणी करावी

सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासनाने कोरोना नियमांची अंमलबजावणी कडकपणे करावी. बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग नसावा. सर्वच नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी यंत्रणांनी लसीकरणावर भर द्यावा असे निर्देश देऊन नागरिकांनी मास्कचा वापर करावा, योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बैठकीपूर्वी बारामती नगरपरिषद आरोग्य विभागाला पियाजियो व्हेईकल प्रा. लि. बारामती यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) कचरा संकलनाकरीता तीन डिझेलची पिकअप वाहने, इतर कामकाजाकरीता दोन सीएनजी इंधनावरील पॅसेंजर ऑटो रिक्षा तसेच एक्सेल कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या 10 घंटागाड्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्यात आले.

बारामती शहरात विविध विकासकामे सुरु

बारामती शहरात विविध विकास कामे सुरु आहेत. अजित पवार यांनी आज वसंतनगर येथील नीरा कालव्यावरील पुलाचे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या व तालीम संघाच्या इमारतीचे नूतनीकरण, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराचे काम, दशक्रिया विधी घाटाचे तसेच कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, बाबूजी नाईक वाडा जुनी कचेरी येथील नवीन संरक्षण भिंतीचे (कंपाऊंड वॉल) आणि तांदुळवाडी येथील रेल्वे मार्गाखालील भूमिगत पुलाच्या (अंडर ग्राउंड ब्रिज) कामाची पाहणी करुन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

सर्व अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत, कामे आकर्षक झाली पाहिजेत. चांगल्या संकल्पनाकाराकडून कामे करुन घ्यावीत. सर्व कामे अर्थसंकल्पित करून घ्यावीत, नियमात बसवून आणि ठराव करुनच कामे करावीत, निधीची आवश्यकता असेल तर पुरवण्या मागण्या सादर कराव्यात. कऱ्हा नदीचे संरक्षक बांधाचे (गॅबीयन वॉल) काम चालू असून नदीचे पाणी कोठेही थांबता कामा नये याकडे लक्ष द्या. कालव्यावरील अनावश्यक झाडे काढावीत, रस्त्यांची कामे व्यवस्थित करावीत असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी विविध कार्यान्वयन यंत्रणाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. (Strict implementation of Corona rules, instructions of Deputy Chief Minister Ajit Pawar)

इतर बातम्या

Nagar Panchayat Election Result : मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, फडणवीसांचा शिवसेनेला जोरदार टोला

राज्यातील 3 जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटीचा भ्रष्टाचार, किरीट सोमय्यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांवरही निशाणा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें