“विनामास्क दिसेल त्याचं तिकीट कट, सगळं ऐकता, मग दादाचं ‘हे’ का ऐकत नाही,” सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना सुनावले

आता जो मास्क घालणार नाही त्याला तिकीट देणार नाही. दादांचं सगळं ऐकता मग हे का ऐकत नाही," अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुनावले आहे.

"विनामास्क दिसेल त्याचं तिकीट कट, सगळं ऐकता, मग दादाचं 'हे' का ऐकत नाही," सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना सुनावले
SUPRIYA SULE

पुणे : “कोविड संपलेला नाही, आता सगळं सुरु झालंय. दादांनी (अजित पवार) परवानगी दिलीये, चला आता काढा गाडी आणि फिरा असं करु नका. आता जो मास्क घालणार नाही त्याला तिकीट देणार नाही. दादांचं सगळं ऐकता मग हे का ऐकत नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुनावले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी सध्याची कोरोनास्थिती तसेच मराठा आरक्षणावर सविस्तरपणे भाष्य केले. (Supriya Sule requested NCP activists to wear mask said will not give ticket to fight election)

दादांनी परवानगी दिलीये, चला आता काढा गाडी असं नको

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना नियमांचे ठिकठिकाणी उल्लंघन होताना दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी कोरोना नियम पाळावेत असे आवाहन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले. “कोविड अजूनही संपलेला नाही. आता सगळं सुरु झालं आहे. त्यामुळे दादांनी ( अजित पवार) परवानगी दिली आहे. चला गाडी काढा आणि फिरा असं करु नका. जरा अजून काही महिने दम धरा. ही सेलिब्रेशन करण्याची वेळ नाहीये. जबाबदारीने वागा. बाहेर पढताना मास्क लावा. तसेच मास्क काढून बोलून नका,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सव्वा वर्षात दादांचा चेहरा बघितलाय का कोणी ?

तसेच पुढे बोलताना त्यांनी कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दाखला दिला आहे. “दादा एक सेकंदही मास्क काढत नाहीत. दादाचं सगळं ऐकता तर हे का ऐकत नाही? कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी जास्त पाळा. सव्वा वर्षात किती जणांनी दादाचा चेहरा बघितलाय ?,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

विनामास्क दिसेल त्याचं तिकीट कट

“आता जो मास्क घालणार नाही त्याला तिकीट देणार नाही. जो विनामास्कचा दिसेल त्याचं तिकीट कट होईल. विनामास्कचे फोटो आले की त्याचही तिकीट कट केलं जाईल. याबाबत मी दादाला आयडिया देते. अन् जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनाही सांगते. हा नियम सगळ्या राज्यात लागू करायला लावते,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अतिशय संवेदनशीलपणे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे पाहते

पुढे बोलताना त्यांनी सध्याच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरसुद्धा भाष्य केले. “मी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे अतिशय संवेदनशीलपणे पाहते. संविधानाने जे अधिकार दिलेत त्यामुळं कोणालाही रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलन करता येतात. या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतलीये. तेव्हा याविषयाची सविस्तर चर्चा झालीये. अन हे सगळं स्पष्टपणे लोकांसमोर आलं आहे,” असे सुप्रिय सुळे म्हणाल्या.

इतर बातम्या :

Modi cabinet expansion 2021 : नारायण राणे, प्रीतम मुंडेंना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता किती?

मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, नाना पटोलेंचं रोखठोक मत, 5 वर्ष मुख्यमंत्री कोण?

(Supriya Sule requested NCP activists to wear mask said will not give ticket to fight election)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI