PMRDA विकास आराखड्यावर हरकती नोंदवण्यासाठी अखेर मुदतवाढ! आता या तारखेपर्यंत नोंदवा हरकती

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) प्रारूप विकास आराखड्यावर (Development Plan) हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी राज्य सरकारने (State Government) 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांना विकास आराखड्यावर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत.

PMRDA विकास आराखड्यावर हरकती नोंदवण्यासाठी अखेर मुदतवाढ! आता या तारखेपर्यंत नोंदवा हरकती
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) प्रारूप विकास आराखडा

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) प्रारूप विकास आराखड्यावर (Development Plan) हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी राज्य सरकारने (State Government) 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांना विकास आराखड्यावर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत.

पीएमआरडीने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावर ग्रामीण भागात नाराजीचा सूर आहे. अनेक ठिकाणी चुकीचं आरक्षण टाकलं गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे आरक्षण बदलण्याची मागणीही जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर हरकती नोंदवण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी ग्रामीण भागातून होत होती. अखेर सरकारने हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. (The state government has given an extension of 15 days to register objections on the development plan of PMRDA)

15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार

महापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) प्रारूप विकास आराखडा 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्याचं काम सध्या सुरू आहे. 23 ऑगस्टपर्यंत विकास आराखड्यावर साडे आठ हजार हरकती दाखल झाल्या आहेत. 30 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता वाढवून 15 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे.

विकास आराखड्याबाबत ग्रामीण भागात तीव्र भावना

पीएमआरडीएच्या (PMRDA) विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या आरक्षणाबाबत ग्रामीण भागात तीव्र भावना आहेत. या आराखड्यानुसार सार्वजनिक कामांसाठी जागाच सोडल्या नसल्याचा आक्षेप नोंदवण्यात येत आहे. वर्षानुवर्षे ज्या निवासी क्षेत्रात लोक राहतात तिथे ग्रीन झोन म्हणजेच वनीकरणाचे आरक्षण टाकण्यात आलं आहे. तर जिथे ग्रीन झोन आहे तिथे औद्योगिक क्षेत्राचे आरक्षण टाकण्यात आलं आहे. अनेक गावांत तर डोंगर उतारावर शेतीचं आरक्षण टाकलं आहे.

पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी अभ्यास न करताच चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकलं असल्याचं आरोप करण्यात येत आहे. या चुकीच्या आरक्षणाबाबत जिल्हा परिषदेत ठराव मांडण्यात आला. त्यानंतर तो बहुमताने पारितही करण्यात आला.

कशा आणि कुठे दाखल कराल हरकती आणि सूचना?

प्राधिकरणाच्या औंध कार्यालयासह आकुर्डी कार्यालय (नवीन प्रशासकिय इमारत पिपरी चिंचवड प्राधिकरण), वाघोली क्षेत्रीय कार्यालय, नसरापूर क्षेत्रीय कार्यालय, वडगाव मावळ क्षेत्रीय कार्यालय इथं हरकती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने लिखित स्वरूपात हरकती आणि सूचना देता येणार आहेत.

कुठे पाहता येईल विकास आराखडा?

पुणेकरांना पीएमआरडीएच्या औंध इथल्या महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन इथल्या कलादालनात हा विकास आराखडा उलपब्ध करून देण्यात आला आहे. सोबतच पीएमआरडीएच्या www.pmrda.gov.in या वेबसाईटवरही विकास आराखडा पाहता येईल. यासोबतच आता प्राधिकरणाने नागरिकांच्या सोयीसाठी सर्व तहसिल कार्यालयांमध्ये विकास आराखड्याचे नकाशे लावले आहेत. तसेच हरकती नोंदवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

इतर बातम्या :

‘काही जित्राबं लय वाईट असतात’, अजित पवारांच्या सडेतोडपणाचे 8 पुरावे, वाचा सविस्तर

पुण्यातल्या अॅमिनिटी स्पेसच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय? उद्या अजित पवारांनी बोलावली महत्वाची बैठक

पुण्यातल्या अॅमिनिटी स्पेसचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात? भाजपने भेटीसाठी मागितली वेळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI