वैष्णवीने आधीही घेतले होते विष… एफआयआरमधून धक्कादायक माहिती उघड
राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर आता एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे, त्यांनी यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे, या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दरम्यान आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे यापूर्वी देखील वैष्णवी हागवणे यांनी जेवणात विष कालवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एफआयआरमधून ही माहिती समोर आली आहे. याबाबत वैष्णवीचे वडील अनिल साहेबराव कस्पटे यांनी ही माहिती दिली आहे.
एफआयआरमध्ये नेमकं काय म्हटलं?
ऑगस्ट 2023 मध्ये माझी मुलगी वैष्णवी ही गरोदर असताना, तीने ही आनंदाची बातमी आपला पती शशांक यास सांगितली. मात्र शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला, हे मुलं आपलं नसल्याचं त्याने म्हटलं. तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ केला, तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण केली. तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर वैष्णवी माझ्या घरी आल्यानंतर घडलेला प्रकार तिने मला सांगितला. मात्र सासरच्यांकडून होणारा मानसिक त्रास सहन न झाल्यानं तिने 27 नोव्हेंबर 2023 रोजी विषारी औषध जेवणातून घेतले. त्यामुळे तिची तब्येत बिघडली, आम्ही तिला एम्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिच्यावर चार दिवस उपचार सुरू होते. मात्र तिच्या सासरहून कोणीही तिची विचारपूस करण्यासाठी तिथे आलं नाही.ती पूर्ण बरी झाल्यानंतर काही दिवस आमच्याच घरी होती. आम्ही तिला पुन्हा तिच्या सासरी नेऊन घातलं. मात्र तिचा छळ सुरूच होता. त्यानंतर साधारणपणे 15 दिवसानंतर माझे जावई शशांक हे माझ्या राहत्या घरी आले व त्यांनी माझ्याकडे जमीन घेण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली, असं वैष्णवीच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षाच्या मुलीने पैशाच्या मागण्यांमुळे आणि सासरच्या जचाला कंटाळून आत्महत्या केली? ह्या जमान्यात?
अंगावर इतक्या जखमा ?
पैशासाठी एका मुलीचे इतके हाल ? इतकी मारहाण ?
FIR वाचून हादरले. खूप ह्या कुटुंबाची कसून चौकशी झाली पाहिजे. pic.twitter.com/V3vALKybRB
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 21, 2025
16 मे रोजी माझे दाजी उत्तम बहिरट यांचा मुलगा प्रणव बहिरट याच्या मोबाईलवर शशांक हगवणेचा फोन आला, माझे आणि वैष्णवीचं भांडण झालं आहे तिला घरी घेऊन जा असं त्याने सांगितलं, त्यानंतर प्रणव याने त्याला दोन ते तीन वेळा फोन करून भांडणाचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने फोन उचलला नाही, त्यानंतर त्याचा सायंकाळी साडेचारच्या सुमारास फोन आला, वैष्णवीने गळफास घेतल्याचं त्याने आम्हाला सांगितलं असंही तिच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.