चांदीची भांडी, फॉरच्युनर, 51 तोळं सोनं अन्… वैष्णवीच्या लग्नात हुंड्याचं घबाड; नेमकं काय काय दिलं?
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. तिच्या आई-वडिलांनी सासऱ्यांवर हुंड्यासाठी छळ करण्याचा आरोप केला आहे. दरम्यान वैष्णवीच्या लग्नात तिच्या आई-वडिलांनी हुंड्यात नक्की किती गोष्टी दिल्या आहेत. तरीही सासऱ्यांनी तिचा हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला, असा आरोप आहे.

पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणेच्या मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवी शशांक हगवणेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी दि. 16 मे दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्याने वैष्णवीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं अशी तक्रार तिच्या घरच्यांनी पोलिसांत केली आहे. वैष्णवीच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी लेकीचा छळ सुरू होता. त्यातून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप वैष्णवीच्या आई-वडिलांनी केला आहे
वैष्णवीच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलाय
वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. आत्महत्या केलेल्या वैष्णवीच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलाय. हुंड्यासाठी आपल्या लेकीचा छळ सुरू होता. त्यातून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप वैष्णवीच्या आई-वडिलांनी केला आहे. दरम्यान, याच वैष्णवी हगवणेची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपवरून आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. वैष्णवी आणि शशांक यांचा 28 एप्रिल 2023 रोजी सूसगाव येथे प्रेमविवाह झाला होता.घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं. परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता.
वैष्णवीच्या घरच्यांनी हुंडा म्हणून काय काय दिलं होतं?
वैष्णवीच्या घरच्यांनी अगदी शाही पद्धतीने लेकीचं लग्न करून दिलं होतं. लग्नात लाखोंचा खर्च केला होता. वैष्णवीच्या घरच्यांनी तिला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागीतली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालुन पाडुन बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेत सासु लता, नंनंद करीश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दिर सुशील हगवणे यांनी शारीरीक व मानसिक त्रास देणं सुरू केलं, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.
जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी
तसेच पती शशांक याने वैष्णवीला तिच्या माहेरच्यांकडून जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी तिच्या माहेरून पैसे न मिळाल्याने जावई शशांक यांनी घरी जावुन वैष्णवी हिस ‘तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भिक लागली काय, मी तुला काय फुक्कट पोसणार आहे काय, तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या आख्या खानदानाचा काटाच काढतो’ असं म्हणत वैष्णवीला धमकी दिली होती. याबाबत वैष्णवीने माहेरी सांगितलं असल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
घटनेनंतर राजेंद्र हगवणे फरार आहेत
वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. वैष्णवीची आत्महत्या नसून, खून झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. या घटनेनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे फरार झाले आहेत, तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.