Vikas Gogawale: एक केस झाली म्हणून…विकास गोगावलेंचा विरोधकांना थेट इशारा, शिंदेसेना-अजितदादांचा राष्ट्रवादीत वाद पेटणार?

Vikas Gogawale Wars Opponents: महाड नगर परिषदेतील वादाचे पडसाद अद्यापही उमटत आहे. गेल्या वर्षाचा वाद नवीन वर्षातही कायम असल्याचे मानले जात आहे. आता विकास गोगावले यांनी विरोधकांना चांगलाच दम भरला आहे. त्यांनी मोठा इशारा दिला आहे.

Vikas Gogawale: एक केस झाली म्हणून...विकास गोगावलेंचा विरोधकांना थेट इशारा, शिंदेसेना-अजितदादांचा राष्ट्रवादीत वाद पेटणार?
विकास गोगावले
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 27, 2026 | 9:31 AM

Vikas Gogawale Wars Opponents: रायगड जिल्ह्यात अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विस्तवही जात नाही. दोन्ही पक्षात पालकमंत्री पदावरून सुरु असलेला वाद नगर परिषद निवडणुकीत थेट मारहाणीपर्यंत पोहचला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. विकास गोगावले हे अनेक दिवसांपासून पोलिसांच्या नजरेआड होते. अखेर हायकोर्टाच्या दट्ट्यानंतर ते पोलिसां समक्ष हजर झाले. त्यांच्यासह आठ जणांना जामीन मिळाला आहे. जामीन मिळताच ते राजकारणात सक्रीय झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र त्यांनी सुरू केले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलाच दम भरला. त्याची आता चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

एक केस झाली म्हणून…

मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणार नाही. विकास गोगावलेच्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावलेच रक्त आहे. कार्यकर्त्याच्या वाट्याला गेलेलं आपल्याला सहन होत नाही. न्याय देवतेने आदेश दिला म्हणून मी शरण गेलो असं विकास गोगावले यांनी सांगितले. पण त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिल्याचे मानले जाते. त्यामुळे येत्या काळात रायगडमध्ये शह-कटशहाचं राजकारण दिसण्याची शक्यता आहे.

वादाचं कारण काय?

महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट समोर आली होती. हिंसाचार आणि राडा घातल्याप्रकरणात विकास गोगावले यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केल्यानंतर विकास गोगावले हे फरार झाले होते. अटक होण्याची दाट शक्यता असल्याने ते अज्ञात स्थळी गुप्त झाले होते. याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांनी ते फरार झाले नाहीत. लवकरच पोलिसांसमोर हजर होतील असे म्हटले होते.

पण दीड महिन्यानंतर जेव्हा हायकोर्टाने याप्रकरणी ताशेरे ओढले, तेव्हा यंत्रणाच नाही तर महायुतीमधील सर्वच खडबडून जागे झाले. विकास गोगावले हे हे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला.त्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी विरोधकांना आता सभेतून मोठा इशारा दिला आहे. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये राडा होतो का की सामंजस्याने वादावर तोडगा निघेल हे लवकरच समोर येईल.