ऑपरेशन टायगर सुरू असतानाच, भास्कर जाधवांचा बॉम्बगोळा, उद्धव सेनेच्या शिलेदाराच्या विधानाने एकच खळबळ
Operation Tiger Bhaskar Jadhav Kokan : सध्या शिंदे गटाने उद्धव सेनेला सुरूंग लावण्यास सुरूवात केली आहे. कोकणात तर शिमगा सुरू आहे. उद्धव सेनेच्या किल्ल्यावर तोफगोळ्याचा भडिमार सुरू असतानाच त्यांचे पक्के शिलेदार भास्कर जाधव यांचे विधान काळजी वाढवणारे आहे.

मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. एका मागून एक प्रवेश होतील. त्यात जुने सहकारी आपल्यासोबत येतील असा दावा त्यांनी केला होता. उद्धव सेनेला जेरीस आणण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यात राजन साळवी यांच्या प्रवेशाने पहिला धक्का देण्यात शिंदे गट यशस्वी ठरला. आता उद्धव सेनेचे खमके शिलेदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने दोन्ही गटाच्या भुवया उंचावल्या आहेत.
भास्कर जाधव नाराज?
क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव आहे, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले. यापूर्वी पण त्यांनी विधानसभा, लोकसभेच्या प्रचारादरम्यान नाराजी व्यक्त केली होती. पण सध्या ऑपेरशन टायगर सुरू असतानाच जाधवांची ही प्रतिक्रिया उद्धव सेनेच्या पोटात गोळा आणणारी आहे.




“बाळासाहेब असताना शिबिरांमधून भाषण करायची मला संधी मिळायची. बाळासाहेब मनोहर जोशींना सांगायचे या पोराला महाराष्ट्रात फिरवा. याला जर महाराष्ट्रात फिरवला तर तळागाळातला माणूस जोडला जाईल. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद मला लाभले त्यानंतर पवार साहेबांचे आशीर्वाद मला लाभले. महाराष्ट्रात माझा एक वर्ग आहे पण क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मला कधीही मिळाली नाही. माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला आडवा आलं आहे.” चिपळूण येथे बोलताना त्यांनी मनातील सल बोलून दाखवली.
माझ्यासाठीचा आदर असाच कायम ठेवा
“माझ्याबद्दल उदय सामंत हल्ली खरोखरच चांगलं बोलत आहेत. उदय सामंत त्यांच्या मनामध्ये काय आहे मला माहित नाही. पण ते आदराने वागत आहेत. मी त्यांना असाच सांगेन तुमचा हा माझ्यापाठी आदर असाच कायम ठेवा”, या त्यांच्या वक्तव्याने उद्धव सेनेच्या भुवया उंचावल्या आहेत.
आम्हाला नवीन ताज्या दमाची फळी तयार करावी लागणार आहे. शिवसेनेचा वारस तपास केला तर शिवसेनेचे वारसदार उद्धव ठाकरे हेच आहेत. ज्या महसूल यंत्रणेने वारस तपास करायचा आहे ते यंत्रणात भ्रष्ट झाली आहे, खरी शिवसेना कोणाची यासंदर्भात भास्कर जाधव यांनी असे भाष्य केले आहे.