Raj Thackrey : जाधव येऊ देत की अन्य कोणी… नरेंद्र जाधव समितीवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी लादण्याच्या निर्णयावर कडाडून निषेध व्यक्त केला आहे. फडणवीस सरकारने जीआर रद्द केल्यानंतरही, त्यांनी डॉ. नरेंद्र जाधव समितीबाबत चिंता व्यक्त केली. मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा अधोरेखित करत, त्यांनी जनतेच्या विरोधाचा उल्लेख केला आणि जाधव समितीकडून मराठी भाषेला न्याय मिळेल याची खात्री करण्याची मागणी केली. त्यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील इतर समस्यांबद्दलही चर्चा केली.

पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही, ते जाधव येऊ देत की अजून कोणीही… आम्ही खपवून घेणार नाही. मराठी भाषेला जनतेचा विरोध आहे. हे त्यांनी समजून घ्यावं अशा स्पष्ट शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हिंदी सक्तीला कडाडून विरोध दर्शवत आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. मराठी भाषा संपली ना तर ती परत येणार नाही, भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर काही अर्थ नाही, असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला राज्यभरातून कडाडून विरोध झाल्यानंतर अखेर फडणवीस सरकारने यासंबंधीचे दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पक जनविरोध, विरोधी पक्षांकडून मिळालेला आंदोलनाचा इशारा आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे हिंदी सक्तीला विरोध दर्शवणाऱ्या सर्वच पक्षांनी जल्लोष केला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने तर याविरोधात पार्मुख्याने भूमिका घेत 5 जुलैला मोर्चाची हाकही दिली होती. मात्र पावसाळी अधिवेशानच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा जीआरा रद्द करण्याची घोषणा केली तसेच त्रिभाषा धोरणाबाबत पुढील पाऊल तज्ञ समितीच्या अहवालानंतरच ठरवले जाईल असे स्पष्ट केले. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ट्विट करत या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती.
मात्र जीआर रद्द झाल्यावर मराठी भाषेचा, अस्मितेचा विजय झाल्याचे सांगत त्या आनंदात मनसेतर्फे जल्लोष करण्यात आला. या आनंदात सहभागी झालेल्या राज ठाकरे यांचे औक्षण करण्यात आले, अभिनंदही करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा भूमिका स्पष्ट केली. हिंदी सक्तीच्या मुद्यावरून सडेतोड भूमिका मांडतानाच त्यांनी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीबाबतही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले राज ठाकरे ?
पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही, ते जाधव येऊ देत की अजून कोणीही.. महाराष्ट्रामध्ये (या निर्णयाला) मराठी माणसांनी ज्या प्रकारे विरोध केलेला आहे, त्याची जाणीव जाधवांना असेल. आम्ही खपवून घेणार नाही. मराठी भाषेला जनतेचा विरोध आहे. हे त्यांनी समजून घ्यावं. महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न तुंबलेले आहेत, भाषेवरती उगाच प्रश्न आणू नका असंही राज ठाकरे यांनी सुनावलं.
विधानभवनात जे विरोधात बसलेले आहेत, त्यांनाही माझं हेचं सांगणं आहे आमदारांना की सुरू असलेल्या अधिवेशनात मूलभूत प्रश्न जे आहेत, त्याबद्दल बोलावं. शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत, शाळा नाहीयेत, शिक्षकांना पगार नाहीत. एकेका शिक्षकावंर वेगवेगळ्या विषयांचं ओझं टाकलं जातं, त्यांना इतर कामंही दिली जातात इतके जे विषय आहेत, त्या विषयांना हात घालावा, ते मांडा असे आवाहन राज ठाकरेंनी आमदारांना केलं.
महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम सुरू..
राज्याच्या बाबत उद्या मराठी माणसाच्या विरोधात मराठी भाषेच्या विरोधात कोणी असेल तर त्याला विरोध असेल. उद्धव ठाकरे यांच्या काळात उच्च शिक्षण यातला तो मुद्दा होता. त्यानंतरचा तो विषय आहे, हे कानावर आलं,असं राज ठाकरे म्हणाले. डिटेल्स आले नाहीत. ठाण्याच्या माणसाने सही केली आहे. मराठी, महाराष्ट्र, मराठी भाषा या विषयावर कोणाही कडून तडजोड होता कामा नये. सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आपण सतर्क राहावं असं मराठी माणसांना आवाहन आहे. ५ तारखेच्या मोर्चात मी बोलेन.
