राज ठाकरेंचा पॅटर्नच वेगळा, मुळशी पॅटर्न फेम पिंट्या भाईला झापलं? पुण्यात नेमकं काय घडलं?
राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रमेश परदेशी यांना सुनावल्याचे बोलले जात आहे. या चर्चेवर रमेश परदेशी यांनी माहिती दिली आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे हे रोखठोक स्वभावाचे नेते आहेत. एखादी गोष्ट न पटल्यास त्यावर ते थेट नाराजी व्यक्त करतात. प्रसंगी भडकतातही. आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी अनेक वेळा सडेतोड शब्दांत याआधी अनेकदा सुनावलेले आहे. आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मुळशी पॅटर्न चित्रपट फेम पिंट्या भाई अर्थात पुण्यातील मनसेचे नेते रमेश परदेशी यांना सुनावलं आहे. कशाला टाईमपास करतो. कुठेतरी एक ठिकाणी राहा, असे म्हणत राज ठाकरेंनी कानपिचक्या दिल्या आहेत. राज ठाकरे आज (6 नोव्हेंबर) पुण्याच्या दौऱ्यावर होते.
रमेश परदेशी यांना फटकारले?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात आपल्या पक्षाचे शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षातील शिस्त व कामगिरीबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. शहरातील संकल्प हॉलमध्ये ही बैठक पार पडली. या वैठकीला पुण्यातील सर्व शाखा अध्यक्ष, पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष रमेश परदेशी यांना त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून फटकारले. रमेश परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमातील आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. संघाचा कट्टर कार्यकर्ता अशा आशयाचा हा फोटो होता. हाच फोटो राज ठाकरेंनी बघितल्याने त्यांनी परदेशी यांना कार्यकर्त्यांच्या समोर झापलं. “छातीठोकपणे सांगतोस की मी संघाचा कार्यकर्ता आहे. टाईमपास कशाला करतो, एकाच ठिकाणी कुठे तरी राहा,” असे म्हणत राज ठाकरेंनी मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी यांना चांगलेच सुनावले.
बैठकीत नेमकं काय घडलं?
ही बैठक संपल्यानंतर रमेश परदेशी यांनी नेमकं काय घडलं? याबाबत सविस्तर सांगितले आहे. राज ठाकरे यांनी कानपिचक्या वगैरे काही दिल्या नव्हत्या. राज ठाकरे यांनी शाखाअध्यक्षांना एक टास्क दिला होता. हा टास्क पूर्ण करण्यासाठी बराच वेळ देण्यात आला. पण काही कार्यकर्त्यांनी हा टास्क पूर्ण केला नाही. यासंदर्भात राज ठाकरे यांनी आढावा घेतला. ही एक पक्षांतर्गत बैठक होती. मतदारांच्या यादीवर काम केले पाहिजे, असेही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले अशी माहिती रमेश परदेशी यांनी दिली.
खरंच परदेशी यांना झापलं?
राज ठाकरे यांचा मिश्कील स्वभाव आहे. मी समोर बसलो होतो. शाखाअध्यक्षांशी बोलत असताना त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले. आमच्यात नंतर साधं संभाषण झालं, असेही रमेश परदेशी यांनी स्पष्ट केले.
