Raj Thackrey : सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फारसं वेगळं नाही – राज ठाकरे
सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फारसं वेगळं नाही अशा शब्दात महाराष्टर नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टिप्पणी केली. शेकापच्या वर्धापनदिनानिमित्तच्या मेळाव्यात ते बोलत होते.

सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फारसं वेगळं नाही अशा शब्दात महाराष्टर नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टिप्पणी केली. शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आवर्जून हजेरी लावली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या मिश्कील शैलीत भाषण करत राज्यातील सध्याच्या राजकारणावरून टोला हाणला.
काय म्हणाले राज ठाकरे ?
गेले 2 दिवस जरा तब्येत नरम आहे. मी आज इथे आलो, खरा, पण सकाळीच माझ्यात ताकद नव्हती. काय झालंय ते आजकाल डॉक्टर सांगत नाहीत. पूर्वीचे आजार कसे ताठ मानेने नाव घेऊन समोर यायचे, हल्लीचे येत नाही. म्हणजे हल्लीचे आजार आणि सध्याचं राजकारण फारसं वेगळं नाही. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, तो त्या पक्षातुन या पक्षात आला. मग आपण म्हणतो काय झालं ? व्हायरल होता. महाराष्ट्रात हे व्हायरल खूप फिरत आहे असा मिश्कील टोला राज ठाकरे यांनी हाणला.
शेकापबद्दल राज ठाकरेंनी काय सांगितलं ?
स्वातंत्र्य मिळायच्या आगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष, ३ ऑगस्ट १९४७ ला स्थापन. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं,. स्वातंत्र्य पूर्व काळात स्थापन झालेला राज्यातील एकमेव पक्ष. इतक्या वर्षानंतरही हे टिकून आहे. हे आश्चर्य आहे. १९८१ साली शिवसेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईत झालं होतं. त्याला डांगे प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. कम्युनिस्ट पक्षाचे. कम्युनिस्ट आणि शिवसेनेत विस्तवही जात नव्हते. पण राजकारण आणि राजकारणी उदार होते. मोठ्या मनाचे होते. ते मोठं मन संकुचित झालं आहे. शिवसेनेच्या व्यासपीठावर डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येणं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज आले आहेत असं राज ठाकरे म्हणाले.
