
सध्या महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक चर्चेत असून येत्या 16 मार्चला महाराष्ट्रातील 7 जागांसाठी तर 10 राज्यांतील 30 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी गणित जुळवणं, संख्याबळ यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत होत्या. अखेर आता महायुतीमध्ये भाजपने 4 तर मविआतर्फेही नाव जाहीर करण्यात आलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानाता उतरणार आहेत. विलीनीकरणाचा प्रश्न आता उद्भवत नाही हे जयंत पाटील यांनी जाहीर केल्यानंतर मविआधील काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाने राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका मांडली.
शरद पवारांना पाठवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असला तरी एनसीपीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. दोन्ही एनसीपीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबवण्याची घोषणा करा, तरच शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा मिळेल. अशी एक अट त्यावेळी ठेवण्यात आल्याचं कळतंय, असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला होता. जयंत पाटील यांनी ही घोषणा केल्यावरच काल शरद पवार यांना पाठिंबा घोषित करण्यात आला, याबद्दल राऊतांकडे विचारणा करण्यात आली.
काय म्हणाले राऊत ?
काल जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाबाबत भूमिका स्पष्ट केली. मुळात माझं असं पहिल्यापासून (अजित दादा असल्यापासून) मत होतं की, हे विलीनीकरण वगैरे दंतकथा आहेत, त्यातून काही निष्पन्न होणार नाहीये. काही निष्पन्न होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नव्हती. पण काही लोकांना वाटत असेल, पण ही दंतकथा होती. ती दंतकथा आता संपलेली आहे. आम्हाला सर्वांना मविआ म्हणून एकत्र काम करावे लागेल. याची आमची मानसिक तयारी आहे, असं राऊत यांनी नमूद केलं.
सत्ता येते, सत्ता जाते. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात जबाबदारी दिलेली आहे, ती आम्हाला योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशात, भाजपची सर्व सरकार अपयशी ठरली आहेत, प्रश्नांचा डोंगर आहे समोर, अशा वेळेस जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागणार आहे. जे विरोधी पक्षात आहेत, त्यांनी उगाच सत्तेच्या मागे (आत्ता) धावू नये. आगामी, पुढल्या निवडणुकांची तयारी करावी, असं आमचं मत आहे, असा सूचक इशारा राऊतांनी दिला.