‘माझं चुलत्याच्या पुण्याईने चांगलं चाललंय…’, अजितदादांची पुन्हा एकदा फटकेबाजी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं आहे. 'माझं बापजादा आणि चुलत्याच्या पुण्याईने चांगलं चाललं आहे, 'असं अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचं नाव न घेता म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘माझं बापजादा आणि चुलत्याच्या पुण्याईने चांगलं चाललं आहे, ‘असं अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचं नाव न घेता म्हटलं आहे. आज अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक संदर्भात बारामतीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, या सभेत ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
ज्यांनी माळेगाव कारखाना निवडणुकीत पाठिंबा दिला आहे, त्यांचे लाख लाख धन्यवाद मानतो. आम्ही ठरवलं गाडी मिळणार नाही फक्त चहा मिळेल. मी आज चेअरमन जाहीर करणार आहे. यावर कार्यकर्त्यानी एकच वादा अजित दादा आशा घोषणा दिल्या, कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी नंतर अजित पवार यांनी देखील मिष्किल टिपणी केल्याचं पाहायला मिळालं. 22 तारखेला मतदान होईपर्यंत दम टिकवा असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं.
दरम्यान या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी चेअरमन पदासाठी स्वतःच्या नावाची घोषणा केली. मी फॉर्म भरला तर तुमच्या का पोटात दुखतंय? असा सवाल करतानाच संविधानाने मला तो अधिकार दिला आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीत माझ्याएवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईल, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं.
मी नुसतं बोलत नाही तर करून दाखवतो, सर्वांची कामं मी करणार आहे. माझं बापजादा आणि चुलत्याच्या पुण्याईने चांगलं चाललंय, मी माळेगाव कारखान्यामध्ये पाच वर्ष भत्ता सुद्धा घेणार नाही, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलं आहे, अजित पवारांची मान खाली होऊन द्यायची की नाही? हे आता तुमच्या हातात आहे. जर सासुरवाडीला जाऊन कारखाना चालवतो तर माझा कारखाना मला चालवीता येणार नाही का? मी सहजासहजी कोणाकडे हात जोडत नाही, परंतु तुम्ही मतदार राजा आहात तुमच्या पुढे मी हात जोडतो, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.