बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावले, पोलिसांचा ससेमिरा मागे लागला अन् तितक्यात…; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यासोबत शेवटच्या क्षणी काय घडलं?
कल्याणमध्ये 'बेपत्ता नगरसेवक' पोस्टर प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलीस चौकशीमुळे तणावात असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे रमेश टिके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून, पक्षाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत

सध्या कल्याण डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या बेपत्ता नगरसेवक पोस्टर प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख रमेश टिके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, पोलिसांच्या दबावामुळेच टिके यांचा बळी गेल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाने केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) आगामी महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी त्यांचे पोस्टर लावले होते. यात नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्यासह कीर्ति ढोणे, राहुल कोट आणि स्वप्निल केणे यांचा समावेश होता. यापैकी मधुर म्हात्रे यांचे पोस्टर लावणाऱ्यांमध्ये रमेश टिके यांचा सहभाग होता.
मात्र, म्हात्रे यांच्या वडिलांनी माझा मुलगा धार्मिक यात्रेवर आहे, तो बेपत्ता नाही असे स्पष्ट करत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मानहानीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रमेश टिके आणि इतर कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि युवा सेना पदाधिकारी नीरज दुबे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. रमेश टिके यांना पोलीस वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून मानसिक त्रास देत होते. या सततच्या दबावामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी तक्रारदार उमेश म्हात्रे आणि संबंधित पोलीस प्रशासनावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
या संदर्भात कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) कल्याण घेटे यांनी प्रतिक्रिया दिली. उमेश म्हात्रे यांच्या तक्रारीवरून मानहानीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. रमेश टिके यांच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडे आलेली नाही, मात्र ठाकरे गटाने दिलेल्या अर्जावरून चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे कल्याण घेटे यांनी म्हटले आहे.
सध्या कल्याण पूर्वेत या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. ठाकरे गटाने याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. राजकीय द्वेषातून ही कारवाई झाल्याचा आरोप होत असताना आता पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
