गाववाल्यांनु लक्ष द्या, 13 ऑक्टोबरला होणार आरक्षण सोडत, तुमचा पंचायत समिती गट कोणासाठी राखीव?
राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी तसेच पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतीपदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली होती, दरम्यान त्यानंतर आता राज्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षणाची सोडत येत्या 13 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
उत्सुकता वाढली
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पहाता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढवल्या जाणार? की काही पक्ष या निवडणुकीच्या माध्यमातून स्वबळाची चाचपणी करणार? याच चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, त्यातच आता राज्यात आणखी एका युतीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान हे काहीजरी असलं तरी उमेदवारी कोणाला द्यायची? याच सर्वच पक्षांचं गणित आता 13 ऑक्टोबरला होणाऱ्या आरक्षण सोडतीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे कोणाचं हे गणित बिघडणार आणि कोणाच्या पथ्थ्यावर पडणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे, येत्या 13 ऑक्टोबर रोजी ही सोडत जाहीर केली जाणार आहे.
