संभाजी ब्रिगेडची उद्धव ठाकरेंना ऑफर, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग
संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला ठाणे जिल्हा अध्यक्षांसह इतर जिल्हाध्यक्षही उपस्थित होते.

Sambhaji Brigade On Vidhansabha Election : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या सर्वच पक्ष जोमाने तयारी लागले आहेत. त्यातच आता संभाजी ब्रिगेडने एक मोठी घोषणा केली आहे. “ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही विधानसभेसाठी 25 जागा मागितल्या आहेत. आमच्याकडून निवडणूक लढण्यास अनेक जण इच्छुक आहेत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा लढू”, असे विधान संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांनी केले. ते ठाण्यात बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतंच संभाजी ब्रिगेडची ठाण्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. ठाण्यात जिल्हाध्यक्षांचे विश्रामगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला ठाणे जिल्हा अध्यक्षांसह इतर जिल्हाध्यक्षही उपस्थित होते.
या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांनी विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केले. “महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी, किती उमेदवार असणार, कोण किती उमेदवार देणार याकडे आमचं लक्ष आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्याबद्दल चर्चा होईल. आमची ठाकरे गटासोबत युती आहे. संभाजी ब्रिगेडची विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि इतर भागात ताकद आहे”, असे मनोज आखरे म्हणाले.
“आम्ही निवडणुका लढवणार”
“येत्या 23 ऑगस्ट रोजी पुण्यात लोकशाही जागर सभा होणार आहे. आमच्याकडून विधानसभा लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. आम्ही सक्षम आहेत. लोकशाही वाचली पाहिजे. समाज कार्यसाठी आम्ही निवडणुका लढवणार आहे. आता लवकरच आम्ही जागर सभेसाठी आणि पुढील आंदोलन कशा पद्धतीने करायची याबद्दल बैठक घेऊ”, असेही मनोज आखरे यांनी म्हटले.
“महिलांना न्याय मिळाला पाहिजे”
यावेळी मनोज आखरे यांनी सरकारवर टीका केली. “सरकारकडून फसव्या योजनांचे अमिष दाखवले जात आहे. लाचार बहीण, लाचार बहीण अशा योजना निवडणुका आल्यावर येतात. शेतकऱ्यांना अन्नधान्यांचे भाव द्यावे. तरुणांना रोजगार दिला पाहिजे. महिलांना न्याय मिळाला पाहिजे. आमची नाळ जमिनीशी आणि जनतेशी जोडली आहे”, असे मनोज आखरे म्हणाले.
