
महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत महायुतीला बऱ्याच ठिकाणी घवघवीत यश मिळाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपला ८९ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे तो सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गटाला २९ जागा जिंकता आल्या. सध्या मुंबईत महापौर कोण होणार यावरुन आता रणकंदन सुरु आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. आता याच दौऱ्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केला आहे. दावोसमध्ये सध्या मुख्यमंत्र्यांची पंचतारांकित पिकनिक सुरू असून, स्थानिक कंपन्यांशी परदेशात जाऊन करार करणे हे अत्यंत हास्यास्पद आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारचा समाचार घेतला.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दावोसमध्ये होणारी ही कॉन्फरन्स केवळ देखावा ठरत आहे. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिथे जाऊन एकमेकांनाच भेटत आहेत. विशेष म्हणजे, ज्या कंपन्यांचे मुख्यालय मुंबईत (बीकेसी) आहे, अशा जेएसडब्ल्यू (JSW), लोढा आणि पंचशील यांसारख्या कंपन्यांशी करार करण्यासाठी मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत. जे काम मुंबईत बसून होऊ शकले असते, त्यासाठी जनतेच्या कराचा पैसा खर्च करून परदेशात जाण्याची काय गरज? यामुळे जगासमोर महाराष्ट्राचे हसे होत आहे,” अशी टीका संजय राऊत त्यांनी केली.
यावेळी संजय राऊतांनी गेल्या काही वर्षांतील गुंतवणुकीच्या आकड्यांवरूनही सरकारला धारेवर धरले. गेल्या पाच वर्षांतील आकडे पाहिले तर ते ७५ लाख कोटींच्या वर जातात. मग ही एवढी मोठी गुंतवणूक प्रत्यक्षात कुठे आहे? सरकारने केवळ आकडे फुगवून सांगू नयेत, तर आतापर्यंतच्या दौऱ्यांवर झालेला खर्च आणि त्यातून आलेली प्रत्यक्ष गुंतवणूक जनतेसमोर मांडावी, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
यावेळी संजय राऊतांनी मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीका केली. स्वतःला शिवसेना म्हणवून घेणाऱ्या आणि बाळासाहेबांचा फोटो लावणाऱ्यांना मुंबईच्या महापौरपदासाठी दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावे लागत आहे, यापेक्षा दुसरी दुर्दैवी आणि अपमानास्पद गोष्ट नाही, असे संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दावोसची पिकनिक संपली की महापौर पदाच्या निवडणुकीत लक्ष घालण्यापेक्षा राज्यातील बेरोजगारी आणि प्रत्यक्ष गुंतवणुकीवर लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.