पहलगाम हल्ल्याला जबाबदार कोण ? संजय राऊतांचा मोठा आरोप
भाजप नेते बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यांनी केलेल्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले, अंगावरचे कपडे, पायातील बूटही भाजपामुळेच आहेत,टीकाकारांवर बोलताना भाजपाच्या बबनराव लोणीकरांची जीभ घसरली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्यातील वातावरण खूप तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोणीकरांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. हे महाशय कधीकाळी काँग्रेस पक्षातही होते. आणि मोदींमुळे या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हाँ लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचाही अपमान आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी आमच्या 26 माय-भगिनींच कुंकू पुसलं, तेसुद्धा मोदींमुळेच पुसलं हेसुद्धा या महाशयांनी (लोणीकर) सांगितलं असतं तर या सत्याला खरोखर एक किनार मिळाली असती अशी घणाघाती टीका राऊतांनी केली. पुलवामामध्ये 40 जवानांची हत्या झाली तेसुद्धा मोदींमुळेच. आणि ट्रंप यांच्यामुळे भारताला युद्धामधून माघार घ्यावी लागली तेही नरेंद्र मोदींमुळेच झालं. मुंबईसारख्या शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेले भूखंड हे मराठी माणसाच्या हाततून काढून अडानींना दिले जातात, तेही मोदींमुळेच आहे, अशी टीका राऊतांनी केली.
काल अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले, त्यांच्या जमिनी प्रोजेक्टच्या नावाखाली मोदींची लोकं हिसकावून घेत आहेत, तेही मोदींमुळेच आहे. या देशात मोदींमुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. या राज्याची जनता स्वाभिमानी आहे लाचार नाही हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोकं भारतीय जनता पक्षात आहेत हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. भाजपचे लोक महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजत आहे, अस्वाभिमानी समजत आहेत, मोदींच्या चरणाचे दास समजत आहेत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असे राऊत म्हणाले.
बबनराव लोणीकर यांचं विधान काय, वाद का पेटला ?
भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर हे गावातील टीकाकारांवर बोलत असताना त्यांची जीभ घसरली. ‘ तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिलेत’ अशी मग्रूर भाषा वापरली. तुमची आई-बहीण आणि बायकोला लाडकी बहिण योजनेचे पैसे आम्हीच देतो. तुमच्या अंगावरचे कपडे आणि बूटसुद्धा आम्हीच दिलेत अशी भाषा लोणीकरांनी वापरली.
“ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्यांच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदींनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट, चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, ते देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेऊन आम्हालाच बोलतो का?” असा सवाल लोणीकर यांनी विचारला.
