मुंबई लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई लूट आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी फडणवीसांवर मुंबई महापालिकेतील 90 हजार कोटींच्या ठेवींची लूट केल्याचा आरोप केला.

सध्या राज्यात महापालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्यातच आता दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस मुंबई आणि ठाणे लुटणाऱ्यांची हंडी फोडली, असे विधान केले होते. आता या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईला लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्यासोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकाही केली.
मुंबईची लूट कोणी केली? राऊतांचा सवाल
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. “मुंबई आणि ठाणे लुटणारे त्यांच्याच सरकारमध्ये आहेत. आमच्या काळात मुंबई महानगरपालिकेत 90 हजार कोटींच्या ठेवी ठेवल्या गेल्या. जर आम्ही मुंबईला लुटले असते, तर एवढ्या मोठ्या ठेवी कशा ठेवल्या गेल्या असत्या? उलट तुम्हीच या 90 हजार कोटींची लूट केली आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत. कोणाला कोणती कामे दिली, याचा पत्ता नाही. पण त्या दोन लाख कोटींवरचे 25% कमिशन त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे. यात फडणवीस यांचे लोकही आहेत,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
त्यांना पाठीशी घालू नका
“मुंबईला कोणी लुटले हे मुंबईच्या जनतेला चांगलेच माहीत आहे. जे खरे लुटारू आहेत, तुम्ही त्यांच्याच हंड्या फोडत आहात. ज्यांनी हंडीमधील दही आणि लोणी ओरबाडून खाल्ले, त्यांच्याच हंड्या आपण फोडत आहात, त्याला काय म्हणायचे? असा सवाल संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस तुमच्या आसपास जे चोर, लफंगे आणि दरोडेखोर आहेत, त्यांना पाठीशी घालू नका, अन्यथा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले.
गौतम अदानींच्या मुद्द्यावरूनही टीका
संजय राऊत यांनी यावेळी गौतम अदानी यांचा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. ही मुंबई कोणी लुटली? मुंबईला कोण लुटत आहे? गौतम अदानी कोणाची हंडी फोडतोय? असे प्रश्न उपस्थित केले. गौतम अदानीची हंडी फोडणारी हीच लोक आहेत आणि अदानीच्या हंडीतील मलाई खाणारी हीच लोकं आहेत. धारावीसह मुंबईतील अनेक महत्त्वाचे भूखंड अदानीच्या घशात घालण्याचे काम फडणवीस करत असताना ते आमच्यावर टीका करत आहेत, हा सर्वात मोठा जोक आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली. “प्रेसिडेंट ट्रम्प यांच्यनंतर राजकारणात जर कोणी जोकर असेल, तर ते देवेंद्र फडणवीस झाले आहेत, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
