तपोवन वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला थेट सवाल, “निवडून दिलं म्हणजे सगळे…”
कुंभमेळ्यासाठी तपोवनातील वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचं, अस कुठे होतं का, असा सवाल त्यांनी केला.

नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी तपोवनासाठी वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी ठाम भूमिका मांडली आहे. निवडून दिलं म्हणजे म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असं नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. “मी जागरूक नाशिककरांना पाठिंबा द्यायला गेलो होते. जिथे झाडं तुटतील तिथे आपण उभं राहिलं पाहिजे. उजाड माळरानाच्या ठिकाणी आम्ही झाडं लावणार. तिथे झाडं नाहीत, कारण तिथली माती चांगली नाही. तिथे कुंभ मेळा भरवला पाहिजे. निवडून दिलं म्हणजे म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असं नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचं, अस कुठे होतं का,” असा सवाल सयाजी शिंदेंनी केला.
राजकारणाबदल माझा अभ्यास नाही, पण झाडाबद्दल राजकारण करू नका. अजितदादांनी पाठिंबा दिला तसा भाजपच्याही काही लोकांनी पाठिंबा दिला आहे. 50 फूटी झाडं तोडायची आणि त्या बदल्यात नवी झाडं लावायची.. एवढी मोठी पळवाट शोधू नका. चुकीचा निर्णय होता कामा नये. सगळी झाडे जगली पाहिजेत. झाडांचा आधी विचार नंतर माणसांचा विचार केला पाहिजे. सगळं आनंदाने व्हावं, अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदेंनी दिली.
गुणरत्न सदावर्तेंना प्रत्युत्तर
साधू आले-गेले काही फरक पडत नाही, पण झाडं गेली तर फरक पडतो, असं वक्तव्य सयाजी शिंदेंनी केलं होतं. त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी साधू-संतांचा अपमान सहन करणार नाही, असं म्हटलं होतं. त्यावर आपण आपले बरे आहोत तिथे खरे, असं प्रत्युत्तर सयाजी शिंदेंनी दिलं. बाकीचे लोक काय बोलतात, त्यांचं त्यांनाच धन्यवाद. त्यांना त्याचं लखलाभ, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, असंही ते म्हणाले.
अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात कलाकार मैदानात उतरले आहेत. सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरणहिताची आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर काहीजण राजकीय कारणाने पर्यावरणवादी बनलेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
नाशिकमधल्या आगामी कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडं तोडण्याला अभिनेते सयाजी शिंदे यांनी विरोध केला आहे. सयाजी शिंदेंच्या या भूमिकेला अजित पवारांनी ट्विट करत पाठिंबा दिला. तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाजी गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं ट्विट अजित पवारांनी केलंय.
कुंभमेळा हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, पर्यावरणही महत्त्वाचं आहे. काही लोकं राजकीय कारणानंदेखील पर्यावरणवादी बनले आहेत. काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावेत, अशा लोकांना आम्ही सांगतो की अडथळे येऊ देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
वृक्षतोडीविरोधात कलाकार एकवटले
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात कलाकारसुद्धा मैदानात उतरले आहेत. नाशिकमधील अनेक नाट्य, चित्रपट, संगीत, कला क्षेत्रातील कलाकार मंडळींनी एकत्र येत भव्य निषेध आंदोलन केलं. अनिता दाते, चिन्मय उदगीरकर यांच्यासह इतरही कलाकार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. लहानपणापासून तपोवन बघतेय, इथली वनसंपदा टिकली पाहिजे, असं अनिता दाते म्हणाली. तर तपोवन वाचवा, तपोवन वाढवा हा आमचा नारा आहे, असं चिन्मय म्हणाला.
