22 वर्षात एकदाही भेट नाही, तरीही दरवर्षी 310 किमी सायकल प्रवास, अब्दुल चाचांचं अनोखं पवार प्रेम!

एकीकडे निष्ठा संपत चाललेली असताना अब्दुल गणी खडके यांनी अविरतपणे 22 वर्षांपासून निलंगा ते काटेवाडीपर्यंत सायकलवरून प्रवास करून, आपल्या लाडक्या नेत्याप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली आहे.

22 वर्षात एकदाही भेट नाही, तरीही दरवर्षी 310 किमी सायकल प्रवास, अब्दुल चाचांचं अनोखं पवार प्रेम!

बारामती : मनुष्य आपल्या जीवनातील महत्वाच्या व्यक्तींवर प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत असतो. मात्र त्यात सातत्य असेलच असं नाही. याला अपवाद ठरले आहेत ते निलंगा येथील 64 वर्षीय अब्दुल गणी खडके. तब्बल 22 वर्षांपासून निलंगा ते काटेवाडी हे 310 किमी अंतर सायकलवरुन प्रवास करत, ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा आगळावेगळा उपक्रम राबवत आहेत.

एकीकडे निष्ठा संपत चाललेली असताना अब्दुल गणी खडके यांनी अविरतपणे 22 वर्षांपासून निलंगा ते काटेवाडीपर्यंत सायकलवरून प्रवास करून, आपल्या लाडक्या नेत्याप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली आहे.

12 डिसेंबर रोजी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी असंख्य कार्यकर्ते येत असतात. मात्र अब्दुल गणी खडके यांच्या शुभेच्छा काही औरच असतात. “शरद पवार यांनी आजपर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकासाठी जे काम केलंय ते न विसरता येणारं आहे. त्यामुळंच आपण या जाणत्या राजाला शुभेच्छा देण्यासाठी सायकलवरून येत असल्याचं” अब्दुल गणी खडके सांगतात. 

महाविद्यालयीन जीवनापासून आपल्याला शरद पवार यांच्याबद्दल आस्था आहे. त्यामुळेच आपण सायकलवरुन त्यांच्या जन्मगावी येऊन शुभेच्छा देतोय असंही अब्दुल गणी खडके सांगतात. आपल्याला त्यांच्याकडून कोणताही स्वार्थ साधायचा नाही किंवा आपल्याला कोणत्या पदावरही बसायचं नाही. केवळ त्यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण काटेवाडीपर्यंत सायकलवर येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

22 वर्षांपासून आपण शुभेच्छा देत असलो, तरी शरद पवार यांच्यासोबत भेट झालेली नाही. मात्र अजितदादा, सुप्रियाताई हे आवर्जून भेटतात. आता काही दिवसात आपली शरद पवार यांची भेट होऊ शकेल असं सांगतानाच तो आपल्यासाठी सर्वोच्च दिवस असेल, असंही अब्दुल गणी खडके यांनी नमूद केलं.

शरद पवार यांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देणाऱ्या अब्दुल गणी खडके यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जातं. बारामतीतील काही तरुणांनी त्यांना सायकल भेट देऊन त्यांचा गौरव केला. त्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच समाजातील तळागाळातील घटक सुखी राहायचा असेल तर शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभावं अशा सदिच्छा ते व्यक्त करतात.

राजकीय नेत्यांच्या आयुष्यात अनेक लोक ये-जा करत असतात. काहीजण नेत्यांकडे जाऊन स्वतःचा स्वार्थ साधतात. त्यामुळे अनेकदा नेत्यांवरील निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. अशा परिस्थितीत अब्दुल गणी खडके यांच्यासारखे बोटावर मोजण्याइतकेच असतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *