Maharashtra Election News LIVE :अजित पवार यांच्या अपघातावर युवा नेते रोहित पवार यांचे अनेक प्रश्न

Live Updates In Marathi : आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत असून या परीक्षेसाठी 10 हजार 664 शाळा आणि कनिष्ठ विद्यालयातील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 27 हजारांनी वाढली आहे. परीक्षेच्या काळात कॉपी होऊ नये यासाठी 271 भरारी पथके तैनात केली आहेत.

Maharashtra Election News LIVE :अजित पवार यांच्या अपघातावर युवा नेते रोहित पवार यांचे अनेक प्रश्न
live updates
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Feb 11, 2026 | 3:03 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे मंगळवारपासून (10 फेब्रुवारी) राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी 10,664 शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीची विद्यार्थीसंख्या सुमारे 27 हजारांनी वाढली आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांसह अन्य काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीस देखील त्या उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Feb 2026 05:34 PM (IST)

    बारावीच्या विद्यार्थ्यांचा लोकलमधून पडून मृत्यू

    बारावीच्या पहिल्या पेपरसाठी घरातून निघालेल्या सोहम सचिन कठरेचा वय १८ वर्ष लोकल रेल्वेमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी ९.१५ वाजता सुमारास कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन सोहम खाली पडला असून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे

  • 10 Feb 2026 05:26 PM (IST)

    एकनाथ खडसे यांना दिलासा, अजामीनपात्र वॉरंटला स्टे

    पुण्याच्या भोसरी जमीन प्रकरणात राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्याविरोधात जारी केलेले अजामीनपात्र वॉरंटला मुंबई हायकोर्टाने स्टे दिला आहे.  एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी 13 तारखेला न्यायालयात सुनावणी दरम्यान हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे.

  • 10 Feb 2026 05:13 PM (IST)

    अजित पवार यांच्या अपघातावर युवा नेते रोहित पवार यांचे अनेक प्रश्न

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर १० तारखेला आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आज दृकश्राव्य माध्यमावर आधारित प्रेझेंटेशन सादर करीत सरकारला अनेक सवाल केले आहेत.

  • 10 Feb 2026 03:56 PM (IST)

    नाशिक : सोयाबीनचे दर घसरले, शेतकरी चिंतेत

    गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला शासकीय हमीभावाहून अधिक दर मिळत असल्याने समाधान व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अमेरिका-भारत करारामुळे सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर 5,800 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले होते. मात्र अचानक यात 500 रुपयांची घसरण होऊन हे दर आता 5,300 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

  • 10 Feb 2026 03:40 PM (IST)

    इचलकरंजी : शहराचे पहिले महापौर म्हणून उदय धातुंडे यांची बिनविरोध निवड

    इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये पहिले महापौर म्हणून भाजपचे उदय धातुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड महापालिकेच्या नवीन सभागृहामध्ये करण्यात आली. लालनगर सारख्या झोपडपट्टी वस्तीमधून मी निवडून आलो, त्याच वस्तीमध्ये लहानाचा मोठा झालो, आज माझ्या नेत्यांनी जो माझ्या विश्वास दाखवला आहे तो मी सार्थक करेन. अशी प्रतिक्रिया उदय धातुंडे यांनी दिली आहे.

  • 10 Feb 2026 03:26 PM (IST)

    विधानभवन परिसरात अजितदादांचे तैलचित्र लावले जाणार

    आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ परिसरामध्ये दिवंगत नेते अजित पवार यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी त्यांचे तैलचित्र विधिमंडळ परिसरात लावण्यात येणार आहे.

  • 10 Feb 2026 03:12 PM (IST)

    धुळे : कॉपीमुक्त अभियानासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची नजर

    धुळे जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 24 हजार 868 विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. जिल्ह्यातील 46 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पाडत असून कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर प्रत्येक वर्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी स्वतंत्र वॉर रूम तयार करण्यात आली आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी या वॉर रूमच्या माध्यमातून या परीक्षेवर लक्ष ठेवून असून अत्यंत पारदर्शकपण ही परीक्षा पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • 10 Feb 2026 02:58 PM (IST)

    चंद्रपुरात नक्कीच मोठा घोडेबाजार – हर्षवर्धन सपकाळ

    “चंद्रपुरात नक्कीच मोठा घोडेबाजार झाला आहे. 1000 कोटीचा सुधीर मुनगंटीवार यांचा बंगला हा चर्चेचा विषय आहे. महापौर बनवण्याकरता त्यांनी तेवढेच पत्ते विकत घेतलेले आहेत. यात मोठा घोडेबाजार झालेला आहे. अशा स्थितीत वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत असायला हवी होती हे तेवढेच खरं आहे” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

  • 10 Feb 2026 02:51 PM (IST)

    भगूर शहरात रेल्वे उड्डाणपुलावरून मोठा वाद

    सावरकर जन्मभूमी भगूर शहरात रेल्वे उड्डाणपुलावरून मोठा वाद निर्माण झालाय. रेल्वे उड्डाणपुलाचा आराखडा चुकीचा असल्याचा आरोप करत भगूर नगरपालिकेने बंद पाडले काम. उड्डाणपूल शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे उतरवला पाहिजे अन्यथा रेल्वेला हद्दीत तोडफोडक व रस्ते बंद करून देणार नाही असा थेट नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांचा इशारा. यासंदर्भात मात्र अद्याप रेल्वे प्रशासनाकडून कुठेही प्रतिक्रिया नाही.

  • 10 Feb 2026 02:37 PM (IST)

    पंढरपूर शहरात झालेल्या डबल मर्डरचे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    सात महिन्यापूर्वी पंढरपूर शहरात झालेल्या डबल मर्डरचे आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पंढरपूर शहरात लखन जगताप आणि सुरेखा जगताप या माय-लेकाची घरात घुसून धारदार शस्त्राने 15 जुलै रोजी करण्यात आली होती हत्या. मयत लखन जगताप याच्या मित्रांनीच केली लखनची आणि त्याच्या आईची हत्या.

  • 10 Feb 2026 02:27 PM (IST)

    पुरंदर विमानतळासाठी भूमी अधिग्रहणाला मान्यता – मुख्यमंत्री

    “छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुरंदर येथे जो विमानतळ होणार आहे, त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिली आहे. निधी उभारण्याकरता मान्यता दिलेली आहे. या संदर्भातली प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

  • 10 Feb 2026 02:17 PM (IST)

    चंद्रपूरवर संदीप देशपांडे काय म्हणाले?

    स्थानिक निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरे यांनी जसा दिला होता, तसाचं उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या स्थानिक लोकांना अधिकार दिला म्हणून तो निर्णय घेतला असेल. कोणीही प्रत्येक वेळेला आकांततांडव करण्याच्या आधी दहा वेळ विचार करायला हवा असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

  • 10 Feb 2026 01:55 PM (IST)

    राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका

    भाषेवरच्या आंदोलनावरुन भागवतांनी केलेल्या वक्तव्यावर टीका. अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका. हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा. नंतरच आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा. तुमच्या कार्यक्रमाला लोक प्रेमाखातर आले नव्हते. तुमच्या कार्यक्रमाला लोक मोदी सरकारच्या भीतीमुळं आले होते असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

  • 10 Feb 2026 01:41 PM (IST)

    सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला

    सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना विश्वासाची, कर्तव्याची, त्यागाची जाणीव. दादांनी विकासासाठी जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. त्यांच्या विचाराचा वारसा जपण्याचा नक्की प्रयत्न करेन असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.

     

  • 10 Feb 2026 01:25 PM (IST)

    मोदींकडून फोन करत शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस

    पंतप्रधान मोदींकडून फोन करत शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस… शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यास आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाणार..

  • 10 Feb 2026 01:10 PM (IST)

    पुढील काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होण्याची शक्यता

    पुढील काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होण्याची शक्यता… विलिनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं… मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौऱ्यात घडामोडी घडण्याचे संकेत

  • 10 Feb 2026 12:58 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात 171 जागांसाठी पोलीस भरती

    जळगाव जिल्ह्यात 171 जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडत असून भरतीची तयारी पूर्ण झाली आहे. 118 पुरुष व 53 महिला अशा एकूण 171 जागांसाठी उद्या 11 फेब्रुवारीपासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. पोलीस भरतीचे यंदाच वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच पोलीस भरती प्रक्रियेत उंची आणि छाती मोजण्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजी चा वापर केला जाणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून भरती प्रक्रियेतील प्रत्येक गोष्टीच चित्रीकरण देखील केलं जाणार आहे. पोलीस भरतीसाठीच मैदान यासह विविध गोष्टींची तयारी पूर्ण करण्यात आलेली असून प्रत्येक गोष्टीचा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाहणी तसेच प्रात्यक्षिक देखील केलं जात आहे.

  • 10 Feb 2026 12:50 PM (IST)

    जनविकास सेना नाराज

    शहर मनपाची पहिली महासभा सुरू, मात्र 66 सदस्य संख्या असलेल्या महापालिका सभागृहात वंचित बहुजन आघाडीचे 2 सदस्य अजूनही पोहोचले नसल्याची माहिती, यानंतरही भाजप -उबाठा शिवसेनेच्या फार्मूल्याचे नक्की काय होते याकडे लक्ष, प्रत्यक्ष सभागृहात काँग्रेसची निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या जनविकास सेनेची काय भूमिका राहते यावरही बरेच काही अवलंबून, त्यांना उपमहापौरपद न मिळाल्याने नाराज आहेत.

  • 10 Feb 2026 12:40 PM (IST)

    अमरावती विभागात दीड लाखांवर विद्यार्थी देणार 12 वी ची परीक्षा

    आजपासून राज्यभरात इयत्ता 12 वी ची परीक्षा सुरू झाली आहे. अमरावती विभागात दीड लाखांवर विद्यार्थी 12 वी ची परीक्षा देणार आहेत. आज पासून 12 वी परीक्षा 543 परीक्षा केंद्र सुरू झाली आहे. अमरावती-माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात होत आहे. अमरावती विभागात एकूण 543 परीक्षा केंद्र राहणार असून 1 लाख 57 हजार 267 विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होत आहेत. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 36 हजार 364 विद्यार्थी असून वाशिम जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजेच 22 हजार 369 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांची संख्या 35 हजार 129 एवढी असून 137 परीक्षा केंद्रे राहणार आहेत.

  • 10 Feb 2026 12:30 PM (IST)

    सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युती

    सांगली महापालिका मध्ये आता भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सत्ता स्थापन होणार आहे. आज भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीचा आज महापौर व उपमहापौर उमेदवारांच्या निवड पार पडणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून याबाबतची घोषणा करण्यात आली होती. तसेच महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावांची देखील चंद्रकांत पाटलांकडून घोषणा करण्यात आली आहे. भाजपाकडुन महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गजानन मगदूम यांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीमध्ये नावांची घोषणा करण्यात आली होती.

  • 10 Feb 2026 12:20 PM (IST)

    विशेष सभेनंतर शहराला नवा महापौर आणि उपमहापौर

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व नगरसेवकांची भाजपाच्या विभागीय कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सभागृहातील मतदान प्रक्रिया, नियम व कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना सभागृहात कशा पद्धतीने मतदान करायचे, कोणत्या प्रक्रिया पाळायच्या, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीनंतर सर्व भाजप नगरसेवक भगवे जॅकेट आणि भगवे फेटे परिधान करून महापालिकेकडे रवाना झाले. थोड्याच वेळात विशेष सभेला सुरुवात होणार असून, शहराला नवा महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे.

  • 10 Feb 2026 12:10 PM (IST)

    बीडमध्ये चंपावती महोत्सवाचे आयोजन, जिल्ह्यातील बाल कलाकारांसाठी मेजवानी

    अनिलदादा जगताप फाऊंडेशन आणि शिवसेनेच्या वतीने बीडमध्ये चंपावती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील बालकलाकारांना मेजवानी मिळाली आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या चंपावती महोत्सवाला जिल्ह्यातील सर्वच शाळांनी सहभाग नोंदविला आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळाला नव्हता हेच लक्षात घेता गेल्या चार वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी चंपावती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

  • 10 Feb 2026 12:00 PM (IST)

    सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार

    सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील,असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून 30 जागा महाविकास आघाडीच्या आला असून 1 जागा सत्तेसाठी लागणार असून समविचारी पक्षांना बरोबर घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करू,असा विश्वासही काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे,ते सांगलीच्या कडेगाव मध्ये बोलत होते.

  • 10 Feb 2026 11:51 AM (IST)

    चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांची बैठक सुरू..

    चंद्रपूर : विधान परिषद आमदार सुधाकर अडनाले यांच्या घरी प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांची बैठक सुरू आहे. शिवसेना उबाठा भाजपसोबत गेल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा करण्यात येत आहे.

  • 10 Feb 2026 11:42 AM (IST)

    शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा फोन

    ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता अशी माहिती समोर आली आहे.  आज सकाळी पंतप्रधानांचा पवारांना फोन आला होता.  पवारांच्या तब्येतीत सुधारणा  होत असून आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.

  • 10 Feb 2026 11:26 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी महत्त्वाची बैठक

    राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे. पक्षाच्या संघटना बांधणीकरता प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीसाठी संदीप देशपांडे यांच्यासह इतरही पदाधिकारी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.

  • 10 Feb 2026 11:11 AM (IST)

    सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्री म्हणून पदभार

    सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला  आहे. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू झाली आहे. आज रात्री त्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

  • 10 Feb 2026 11:06 AM (IST)

    पाईपलाइन फुटल्याने बदलापूरमध्य शेकडो लिटर पाण्याची नासाडी

    बदलापुरातील खरवई रस्त्यावरील होप इंडिया कंपनी समोर असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे.  खरवई जलशुद्धीकरण प्रकल्पातून निघणारी ही दोन फुटाची पाईप लाईन काल सकाळी फुटली असून गेल्या 24 तासात या पाईपलाईन मधून शेकडो लिटर पाणी वाया गेलं आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या मधोमध दहा फूट खाली ही पाईपलाईट असल्याने या पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामात वेळ लागणार आहे.  हा मुख्य रस्ता खोदल्यानंतरच या पाईपलाईनचे काम करण्यात येईल असं जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

  • 10 Feb 2026 10:57 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल; सुप्रिया सुळे रुग्णालयात उपस्थित

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि पत्नी प्रतिभा पवार रुग्णालयात उपस्थित आहेत.

  • 10 Feb 2026 10:47 AM (IST)

    अमरावतीत बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, दीड लाख विद्यार्थी परीक्षा देणार

    अमरावती विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे आयोजित इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून उत्साहात सुरुवात होत आहे. यावर्षी विभागातील ५४३ केंद्रांवरून एकूण १ लाख ५७ हजार २६७ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत ही प्रक्रिया पार पडेल. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी विद्यार्थी संख्या असून, कॉपीमुक्त परीक्षेसाठी १३० संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही आणि कडक पोलीस बंदोबस्ताचा वॉच ठेवण्यात आला आहे.

  • 10 Feb 2026 10:37 AM (IST)

    पनवेल महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज मतदान; राजकीय हालचालींना वेग

    पनवेल महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुतीच्या वतीने महापौर पदासाठी नितीन जयराम पाटील आणि उपमहापौर पदासाठी प्रमिला पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडीमुळे पनवेलच्या स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळणार असून, आज जाहीर होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

  • 10 Feb 2026 10:27 AM (IST)

    बीडमध्ये चंपावती महोत्सवाचा धडाका; बालकलाकारांच्या कलागुणांना मिळाला हक्काचा मंच

    बीड शहरात अनिलदादा जगताप फाऊंडेशन आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित ‘चंपावती महोत्सवा’ने जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला हा महोत्सव जिल्ह्यातील बालकलाकारांसाठी एक मोठी पर्वणी ठरली आहे. कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून या उपक्रमाचे सातत्यपूर्ण आयोजन केले जात आहे. यंदाच्या महोत्सवात जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी आपली प्रतिभा सादर करत आहेत. या महोत्सवाला बीडमधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, शालेय विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने चंपावती नगरी दुमदुमून गेली आहे.

  • 10 Feb 2026 10:17 AM (IST)

    सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता येणार? आमदार विश्वजीत कदम यांनी स्पष्टच सांगितलं

    सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. सध्या महाविकास आघाडीकडे 30 जागा असून सत्तेचा आकडा गाठण्यासाठी केवळ एका जागेची गरज आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी समविचारी पक्षांना आणि नेत्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू, असे विश्वजीत कदम म्हणाले. या विधानामुळे सांगलीच्या स्थानिक राजकारणात आता मोठ्या हालचालींना वेग आला असून, सत्ता स्थापनेसाठी मविआकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

  • 10 Feb 2026 10:06 AM (IST)

    सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह निश्चित, प्रसिद्ध उद्योजकाच्या मुलाशी बांधणार लग्नगाठ

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह नुकताच निश्चित झाला आहे. रेवती सुळे या प्रसिद्ध उद्योजक आणि विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी विवाहबंधनात अडकणार आहेत. सारंग लखानी हे स्वतः एक यशस्वी व्यावसायिक असून ते एक उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत. विशेष म्हणजे, हे लग्न ठरण्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत या आनंदाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या हाय-प्रोफाइल विवाहाची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

  • 10 Feb 2026 09:55 AM (IST)

    भाजपला मदत न करण्याची ठाकरेंची भूमिका – संजय राऊत

    भाजप आणि नियमांचा काहीही संबंध नाही. भाजपला मदत न करण्याची भूमिका ठाकरेंनी घेतली आहे.. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 10 Feb 2026 09:46 AM (IST)

    अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत रोहित पवार आज घेणार पत्रकार परिषद

    बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या अपघाताबाबत राजकीय वर्तुळातून अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यातच आता रोहित पवार यांनी आज मंगळवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही पत्रकार परिषद पार पडणार आहे.

  • 10 Feb 2026 09:35 AM (IST)

    शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे विजय वडेट्टीवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल…

    शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे विजय वडेट्टीवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.  महापौर पदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी उरला अवघा दीड तास आहे. असं असताना चंद्रपूर मधील राजकीय घडामोडींना  कमालीचा वेग आलाय.

  • 10 Feb 2026 09:25 AM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिक दौऱ्यावर

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिक दौऱ्यावर आहेत. चांदवड तालुक्यातील जैन धर्मियांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात दुपारी 3 वाजता पंचपरमेष्ठी मंडपमचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी मोहन भागवत हे उपस्थितांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.

  • 10 Feb 2026 09:15 AM (IST)

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चैत्यभूमीवर दाखल; बाबासाहेबांना अभिवादन

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चैत्यभूमीवर दाखल झाले. बाबासाहेबांना अभिवादन केलं.  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

  • 10 Feb 2026 09:00 AM (IST)

    ठाण्यातील युवा सेना कार्यकारणी सदस्य सिद्धेश अभंगे यांना जीवे ठार मारण्यासाठी आलेल्या 2 आरोपींना अटक

    ठाण्यातील युवा सेना कार्यकारणी सदस्य सिद्धेश अभंगे यांना जीवे ठार मारण्यासाठी आलेल्या दोन सराईत आरोपींना कोपरी पोलीस ठाणे यांनी शिताफीने अटक केली. पोलिसांना आरोपींच्या  बॅगेतून धारदार चाकू आणि काही हत्यारं सापडली आहेत. जीवे मारण्याचा कट कोणी आणि कशासाठी रचला याचा पुढील तपास कोपरी पोलीस करत आहेत. शिवसेनेत सिद्धेश अभंगे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

  • 10 Feb 2026 08:52 AM (IST)

    मंत्रालयाचा सहावा मजला सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी सज्ज

    मंत्रालयाचा सहावा मजला सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. कुंड्या लावून बाहेरचा परिसर स्वच्छ करण्यात आला. ९.३० वाजता सुनेत्रा पवार मंत्रालयात दाखल होणार आहेत, त्यापूर्वी त्या मुंबईतील सिद्धिविनायक आणि चैत्यभूमीला भेट देणार आहेत. यानंतर त्या विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्रालयात कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत.

  • 10 Feb 2026 08:42 AM (IST)

    धाराशिव जिल्हा परिषदेत दोन मोठे विजय, एकाच तालुक्यातून दोन मोठे विजय

    धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत कवठा गटातून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी विक्रमी विजय मिळवला आहे. देशमुख तब्बल ५,५७० मतांनी विजयी झाले असून मराठवाड्यातील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. तर दुसरीकडे उमरगा तालुक्यातील कदेर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांनीही दमदार कामगिरी करत ६,२९० मतांनी विजय मिळवला आहे.

  • 10 Feb 2026 08:32 AM (IST)

    चंद्रपूर- भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात

    चंद्रपूर- भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या ताफ्यातील पोलीस वाहन ओव्हरटेक करताना त्याने दुसऱ्या वाहनाला धडक दिली. या धडकेत कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना आमदार जोरगेवार रात्री नागपूरहून येत असताना चंद्रपूर जवळील मोरवा या गावाजवळ झाली.

  • 10 Feb 2026 08:30 AM (IST)

    नाशिक – ठाकरेंच्या शिवसेनेत विरोधी पक्ष नेतेपदावरून स्पर्धा

    नाशिक – ठाकरेंच्या शिवसेनेत विरोधी पक्ष नेतेपदावरून स्पर्धा सुरू आहे. पंधरा नगरसेवकांपैकी पाच नगरसेवकांमध्ये चुरस रंगली असून विरोधी पक्षनेत्याचा निर्णय मातोश्री वरून होणार आहे. पक्षाच्या संकट काळात जो सोबत, त्यांना प्राधान्य दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.

  • 10 Feb 2026 08:28 AM (IST)

    भाजपच्या तोडीस तोड आमच्या जागा आल्या, जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष झाला तर आनंदच- राजन साळवी

    धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्षपदावरून सत्तासंघर्ष रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या करेक्ट नियोजनामुळे भाजपच्या तोडीस तोड जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत, जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा असल्याचं स्पष्ट संकेत शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी दिले आहेत. “जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष झाला, तर मला आनंदच होईल,” असं ठाम मत राजन साळवी यांनी व्यक्त केलं आहे. या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 10 Feb 2026 08:27 AM (IST)

    आजपासून बारावीची परीक्षा सुरू; कॉपी होऊ नये यासाठी 271 भरारी पथके तैनात

    आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी 10 हजार 664 शाळा आणि कनिष्ठ विद्यालयातील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 27 हजारांनी वाढली आहे. परीक्षेच्या काळात कॉपी होऊ नये यासाठी 271 भरारी पथके तैनात करण्यात आली आहे.

  • 10 Feb 2026 08:25 AM (IST)

    सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या स्वीकारणार पदभार

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीस देखील उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत.

Follow Us