मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांचा जाहीर पाठिंबा, कार्यकर्त्यांना काय केलं आवाहन?
हिंदी भाषेची सक्ती आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर येत्या 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला शरद पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधुंकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. याविरोधात आता पाच जुलै रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मोर्चा काढणार आहेत, या मोर्चाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक पत्रक देखील काढण्यात आलं आहे.
महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०)’ अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी, आणि प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने मातृभाषेतूनच व्हावे या मागणीसाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत पुकारण्यात आलेल्या मोर्चाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा जाहीर पाठिंबा, सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊयात, असं आवाहन या पत्राद्वारे करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पत्रक काढलं आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलं?
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) या धोरणांतर्गत शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषाभिमानाचे ठिकाणी जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ,भाषातज्ज्ञ आणि सर्व भाषाभिमानी शिक्षक वृंद यांच्या पातळीवरून राज्यभरातून विविध आशयाचे निवेदने येत आहेत. परंतु हे सरकार कोणालाही जुमानत नाही, हे सरकार हिंदी सक्ती करू इच्छित असल्याचं दिसते.
महाराष्ट्राच्या जनभावनेचा कुठेच विचार घेतला नसल्याचं जाणवतं, कुणालाही विविध भाषा शिकण्याचा हक्क नाकारणे योग्य नाही, पण शालेय पातळीवरून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून झाले पाहिजे असे घोषित आहे, यावर पक्षाचा कायमच ठाम विश्वास आहे. तरीदेखील, हे सरकार जाणीवपूर्वक मराठी भाषेला दुय्यम दर्जा देत आहे हे अत्यंत दुर्दैवी असून, एकतर्फी निर्णय राबविणे हे तितकेच धोकादायक असल्याचे आम्ही मानतो.
त्यामुळे या हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी येत्या शनिवार, दि. 5 जुलै २०२५ रोजी तामाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोठा मोर्चा पुकारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा आहे. म्हणूनच, मी पक्षातील सर्व लोकप्रतिनिधींना,पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आवाहन करतो आहे की, येत्या 5 जुलैला मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी व्हा, असं या पत्रात म्हटलं आहे.
