शिवसेनेचा बाप मीच, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य, वातावरण तापलं, शिंदे गट आक्रमक
मोठी बातमी समोर येत आहे, भाजप नेते परिणय फुके यांनी शिवसेनेसंदर्भात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, भाजप नेते परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, ते भंडाऱ्यातील भाजप कार्यकरर्ता मेळाव्यात बोलत होते. शिवसेनेचा बाप मीच, असं फुके यांनी म्हटलं आहे. दरम्यान परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. फुके यांनी माफी मागावी अन्यथा, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा या पत्रकार परिषदेमधून शिवसेनेनं फुके यांना दिला आहे.
नेमकं काय म्हणाले फुके?
‘पोरगा जसा दहावीमध्ये पास झाला, चांगले मार्क मिळाले तर कोणी केलं पोराने केलं किंवा आईने केलं. काही चांगलं झालं तर कोणी केलं आईने केलं. आणि काही खराब झालं तर बापानं केलं. त्यामुळे मला हे आता पक्कं माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण सगळं खापर माझ्यावर फोडत आहेत, आणि म्हणून या सगळ्या आरोपांवर लक्ष न देता आपण आपले कामं संपूर्ण तकतीने सुरू ठेवली पाहिजेत, सातत्याने आपला पक्ष वाढवण्याचं काम केलं पाहिजे. आपल्याला एखाद्याने विरोध केला तर आपण ती गोष्ट सर्वांपूढे सांगतो, मात्र जर आपल्याला एखाद्या नेत्यानं मदत केली तर आपण ते सांगत नाही, पण मी सर्वांसमोर सांगतो आणि आभारही मानतो मला दुसऱ्यांदा चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेला संधी दिली.
दरम्यान फुके यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं फुके यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे, तर दुसरीकडे मात्र शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी मात्र फुके यांच्या या विधानावर संयमीत प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोणी तर केलेल्या विधानाला पक्षाचं विधान म्हणून बघता कामा नये, ते माझे मित्रच आहेत. परंतु अशी विधान करण्यापासून सर्वांनी संयम राखला पाहिजे. शेवटी युतीचं सरकार आहे, लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे लोकांची जास्तीत जास्त सेवा आपल्या सरकारच्या माध्यमातून कशी होईल हे पाहिलं पाहिजे, आणि केलेल्या कामाला प्रसिद्धी दिली पाहिजे’ असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
